2020 च्या सुरवातीपासूनच जगात कोरोना व्हायरस (Coronavirus) महामारीने उग्र रूप धारण करायला सुरुवात केली. त्यानंतर अनेक देशांनी विविध आपत्ती पहिल्या. आता म्यानमार (Myanmar) देशातून एक मोठी बातमी येत आहे. म्यानमारच्या कचिन (Kachin) प्रांतात मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) गुरुवारी सकाळी जेड खाणीत (Jade Mine) दरड कोसळली (Landslide). या अपघातात 100 पेक्षा जास्त मजुरांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण जमिनीखाली दबले गेले आहेत. म्यानमार फायर ब्रिगेडने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 113 मृतदेह मातीखालून बाहेर काढण्यात आले आहेत व इतरांचा शोध घेण्यात येत आहे. हा अपघात झाला आहे.
अजून अनेक मृतदेह चिखलात अडकले आहेत तसेच मृतांची संख्याही वाढण्याची शक्यता आहे. या भागात गेल्या एका आठवड्यापासून मुसळधार पाऊस पडत आहे, त्यामुळे बचावकार्यातही अडथळा निर्माण होत आहे. मजूर 250 फूट उंचीवर काम करत असताना हा अपघात झाला. या खाणीजवळ पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे अनेक मजुरांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. वाय खार जिल्ह्याचे प्रशासक यू क्वा मीन यांनी सांगितले की, या अपघातात किमान 200 लोकांचा मृत्यू होण्याची भीती आहे.
म्यानमार येठीत खाणींमध्ये जगात सर्वाधिक जेड स्टोन किंवा हिरव्या रंगाचे मौल्यवान रत्न आढळते. म्यानमारमध्ये दरवर्षी सुमारे 30 अब्ज डॉलर्स जेड स्टोनचा व्यापार होतो. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये दक्षिण-पूर्व म्यानमारमध्ये भूस्खलन झाले होते. यात 59 लोकांचा मृत्यू झाला होता. मुसळधार पावसामुळे हा अपघात झाला होता व त्यावेळी पूर आणि पावसामुळे 80 हजार लोक बेघर झाले होते. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे या परिसरात बराच चिखल झाला आहे. त्यात भूस्खलन झाल्याने अनेक लोक चिखलात अडकले. (हेही वाचा: गेल्या 50 वर्षांत भारतामध्ये 4.58 कोटी मुली ‘गायब’; जगातील 14.26 कोटी Missing मुलींमध्ये चीन व भारतातील 90 टक्के मुलींचा समावेश)
दरम्यान, या खाणींवर शेकडो लोक ये-जा करतात, जे भंगारात जेड स्टोन मिळविण्यासाठी खाणींमधून भंगार शोधत असतात. या भंगारामुळे या भागात एक मोठा उतार तयार झाला आहे. या परिसरात जास्त झाडे नसल्यामुळे जमीन घसरण्याचा धोका वाढला आहे.