धक्कादायक! मुलाच्या हव्यासापायी गेल्या 50 वर्षांत भारतामध्ये 4.58 कोटी मुली ‘गायब’; जगातील 14.26 कोटी Missing मुलींमध्ये चीन व भारतातील 90 टक्के मुलींचा समावेश- UN Report
Representational Image (File Image)

सध्या महिलांच्या सुरक्षेबाबत (Women Security) अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. प्रत्येक सरकारकडून महिलांच्या सुरक्षेबाबत मोठे दावे केले जात आहेत. दरम्यान, मंगळवारी युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंडने (UNFPA) जाहीर केलेल्या ग्लोबल पॉप्युलेशन स्टेटस 2020 (The State of World Population 2020) च्या अहवालात, महिलांच्या सुरक्षिततेच्या दाव्यांची पोलखोल झाली आहे. अहवालानुसार सध्या जगभरात 14.26 कोटी मुली ‘गायब’ (Missing Females) आहेत आणि केवळ भारतातच त्यांची संख्या 4.58 कोटी आहे. या अहवालामध्ये दोन प्रकारात अशा गायब मुलींचे वर्गीकरण केले आहे. जन्माला येण्यापूर्वी गर्भलिंग निदान केल्याने जन्माला न येऊ शकणाऱ्या मुली आणि जन्मानंतर मुलगी म्हणून हिणवल्याने मृत्यू पावलेल्या मुली. या अहवालामध्ये अशा मुलींना ‘मिसिंग मुली’, म्हणजेच गायब झालेल्या मुली असे संबोधले आहे.

चीन आणि भारतमध्ये गायब झालेल्या मुलींची संख्या सर्वाधिक आहे व गेल्या 50 वर्षांत अशा मुलींची संख्या दुप्पट झाली आहे. जगभरात 1970 मध्ये ही संख्या 6 कोटी 10 लाख होती आणि 2020 मध्ये ती 14.26 दशलक्षांवर पोहोचली आहे. अहवालानुसार, 2020 पर्यंत भारतात 4.58 कोटी मुली आणि चीनमध्ये 7.23 कोटी मुली गायब झाल्या आहेत. या दोन्ही देशांत मिळून जगातील 90 टक्के मुली गायब आहेत. 2013 ते 2017 दरम्यान भारतात दरवर्षी सुमारे 4.6 लाख मुली 'जन्माच्या वेळी' गायब झाल्या आहेत. विश्लेषणानुसार, एकूण गायब मुलींपैकी सुमारे दोन तृतीयांश आणि जन्मावेळी झालेल्या मृत्यूंपैकी एक तृतीयांश प्रकरणे ही, लैंगिक भेदभावामुळे लिंग निर्धारणशी संबंधित आहेत.

(हेही वाचा: गर्भलिंग निदानाच्या 'ऑड-इव्हन फॉर्म्युला'बाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरुन इंदोरीकर महाराजांची पलटी, असे बोललो नसल्याचा खुलासा)

भारतात, कमीतकमी नऊ राज्ये अशी आहेत ज्यांचे लैंगिक गुणोत्तर प्रमाण 900  पेक्षा कमी आहे. यामध्ये- हरियाणा, उत्तराखंड, दिल्ली, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब आणि बिहार राज्यांचा समावेश आहे. अशाप्रकारे मुलाच्या हव्यासापायी भारतामध्ये इतक्या मुली गायब झाल्या आहेत. दरम्यान, या अहवालात असेही म्हटले आहे की, गेल्या दशकात बालविवाहांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. 2005-06 मध्ये याचे प्रमाण 47 टक्के होते, ते घसरून 2015-16 मध्ये ते 27 टक्के इतके झाले.