
Myanmar Earthquake: म्यानमार (Myanmar) ला पुन्हा एकदा भूकंपाचा (Earthquake) तडाखा बसला आहे. म्यानमारमध्ये रविवार, 13 एप्रिल 2025 रोजी पहाटे पुन्हा एकदा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले, ज्यामुळे लोक घाबरून घराबाहेर पळाले. रविवारी सकाळी झालेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.5 इतकी मोजण्यात आली. येथे नुकत्याच झालेल्या भूकंपामुळे प्रचंड विनाश झाला, ज्यामध्ये तीन हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीनुसार, 13 एप्रिल 2025 रोजी सकाळी 07:54:58 वाजता म्यानमारमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाचे केंद्र जमिनीत फक्त 10 किलोमीटर खोलवर होते. सध्या कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.
याआधी 28 मार्च 2025 रोजी म्यानमारमध्ये 7.7 तीव्रतेचा भयानक भूकंप झाला होता आणि या भूकंपामुळे संपूर्ण देशात मोठी हानी झाली होती. लष्कराच्या म्हणण्यानुसार, या भूकंपात आतापर्यंत 3600 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे, तर पाच हजारांहून अधिक लोक जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. (हेही वाचा -Pakistan Earthquake: पाकिस्तानमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के; 5.8 रिश्टर स्केल मोजण्यात आली भूकंपाची तीव्रता)
पाकिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के -
दरम्यान, शनिवारी, पाकिस्तानमध्ये 5.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला, ज्याचा केंद्रबिंदू पाकिस्तानमध्ये होता, तर त्याचे धक्के जम्मू आणि काश्मीरमध्येही जाणवले. हवामान विभागाचे संचालक मुख्तार अहमद यांनी सांगितले की, शनिवारी दुपारी 13:00:55 IST वाजता भारतीय प्रमाणवेळेनुसार 33.63 अंश उत्तर अक्षांश आणि 72.46 अंश पूर्व रेखांशावर 5.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. (हेही वाचा - Nepal Earthquake: म्यानमार-थायलंडनंतर आता नेपाळला भूकंपाचा धक्का; 5.0 रिश्टर स्केल होती भूकंपाची तीव्रता)
तथापी, या भूकंपाचे केंद्र पाकिस्तानमध्ये होते. भूकंप पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 10 किलोमीटर खाली झाला. यामुळे जम्मू आणि काश्मीरमध्येही सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. यापूर्वी 8 ऑक्टोबर 2005 रोजी पाकिस्तानमध्ये 7.6 रिश्टर स्केलचा भूकंप झाला, ज्याचे केंद्रबिंदू पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील मुझफ्फराबाद येथे होते. या भूकंपात नियंत्रण रेषेच्या (एलओसी) दोन्ही बाजूंनी 80,000 हून अधिक लोक मृत्युमुखी पडले होते.