Larry Tesler Computer scientist (PC - Wikimedia Commons)

सध्या कॉम्प्युटरमधील काही किजमुळे संगणक वापरणं सोपं झालं आहे. आपण संगणकावर काम करताना विविध स्वरुपाचे शॉर्टकट वापरत असतो. यातील एक म्हणजेचं कट, कॉपी, पेस्ट. (Cut-Copy-Paste) हा शॉर्टकट शोधून काढणाऱ्या लॅरी टेस्लर (Larry Tesler) या संगणक तज्ञाचे निधन झाले आहे. लॅटी टेस्लर हे 74 वर्षांचे होते.

लॅरी टेस्लर यांचा जन्म 1945 मध्ये न्यूयॉर्कमध्ये झाला होता. त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठात कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी प्राप्त केली होती. 1973 मध्ये लॅरी टेस्लर यांनी झेरॉक्सच्या पॉलो आल्टो रिसर्च सेंटरमध्ये आपल्या करिअरची सुरुवात केली. त्याचवेळी त्यांनी 'कट, कॉपी, पेस्ट' ही संकल्पना शोधली. तेव्हापासून सर्व संगणकांमधील प्रोग्रॅमिंगमध्ये ही संकल्पना वापरली जाते. (हेही वाचा - कौतुकास्पद! भारतीय वंशाचे श्रीनिवासन यांची अमेरिकेतील 'फेडरल सर्किट न्यायालया'च्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती)

लॅरी टेस्लर यांनी 1980 मध्ये झेरॉक्स कंपनीतून ऍपलमध्ये काम करण्यास सुरुवात केली. झेरॉक्स कंपनीने आपले लक्ष छायाकिंत प्रत तयार करण्यासाठी मशिन निर्माण करण्यावर केंद्रित केल्यामुळेच लॅरी टेस्लर यांनी ती कंपनी सोडली आणि ऍपल कंपनीमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी ऍपलने कॉम्प्युटर निर्मितीवर लक्ष केंद्रीत करण्याचे निश्चित केले होते. तेव्हा ऍपल कंपनीचे नेतृत्त्व स्टिव्ह जॉब्ज करत होते. लॅरी टेस्लर यांचे लिसा आणि इतर ऍपल उत्पादनांच्या निर्मितीमध्ये मोठे योगदान आहे. लॅरी यांनी 2001 पासून 2005 पर्यंत अॅमेझॉनमध्ये काम केले. त्यानंतर काही दिवसांनी त्यांनी अॅमेझॉनमधून राजीनामा देऊन याहूमध्येही काम केले. लॅरी यांच्या 'कट, कॉपी, पेस्ट' या शॉर्टकट किजमुळे संगणक वापरणे अधिक सोयीस्कर झाले आहे.