LA International Airport: बाबो! पठ्ठ्याने चक्क चालत्या विमानातून मारली उडी; जाणून घ्या काय घडले पुढे
विमान | संग्रहीत आणि प्रतिकात्मक प्रतिमा

विमानप्रवासाबाबत अनेक रंजक किस्से आपल्या कानावर पडले असतील. मात्र लॉस एंजेलिस आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Los Angeles International Airport) घडलेली घटना कदाचित तुम्हाला आश्चर्याचा धक्का देईल. तर या विमानतळावर चक्क चालल्या विमानातून एका व्यक्तीने खाली उडी मारली आहे. स्काय वेस्टद्वारे चालविण्यात येणारे सॉल्ट लेक सिटीला जाणारे युनाइटेड एक्सप्रेसचे विमान 5365 (United Express Flight 5365), संध्याकाळी 7 गेटमधून बाहेर पडत होते. त्याचवेळी प्रवाशाने विमानामधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी संध्याकाळी ही घटना घडली.

चालत्या विमानात या प्रवाशाने गेटमधून बाहेर उडी मारण्याचा प्रयत्न केला असता, त्याला मागे ओढून घेण्यात आले. यानंतर प्रवाशाने कॉकपिट तोडून तेथून उडी मारण्याचा प्रयत्न केला परंतु नंतर सर्व्हिसच्या दाराबाहेर उडी मारुन तो चालत्या विमानातून बाहेर पडण्यात यशस्वी ठरला. त्यानंतर ताबडतोब या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आणि नंतर रुग्णालयात नेण्यात आले. सुदैवाने या व्यक्तीला कोणतीही गंभीर किंवा जीवघेणी दुखापत झाली नाही.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, व्यक्तीच्या या कृत्यानंतर विमान तीन तासासाठी उड्डाण करू शकले नाही. या घटनेत विमानमधील इतर कोणीही जखमी झाले नाही. यानंतर या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश एफबीआयला देण्यात आले. लॉस एंजेलिस आंतरराष्ट्रीय विमानतळावरील मागील दोन दिवसातील ही दुसरी अशी घटना आहे. गेल्या गुरुवारी एक ड्रायव्हर फेडएक्स कार्गो सुविधेत चेन लिंक बॅरिअर तोडून एअर फिल्डमध्ये घुसला होता. त्यानंतर त्याने धावपट्टी ओलांडण्यास सुरवात केली पण लवकरच पोलिसांनी त्याला पकडून त्याच्या कारसह ताब्यात घेतले.

फेडरल एव्हिएशनए एडमिनिस्ट्रेशनने (FAA) म्हटले आहे की, यावर्षी प्रवाशांकडून सुमारे तीन हजारहून अधिक वेळा ब्रेकआऊट केले गेले आहेत. यातील बहुतांश प्रवाशांनी विमानात मास्क न घालण्याविषयीचे नियम मोडले आहेत.