H1-B व्हिसा धारकांच्या जोडीदारास Joe Biden सरकारचा दिलासा; H4 Work Permit बद्दल घेतला मोठा निर्णय
H1B Visas | Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

जो बिडेन (Joe Biden) यांनी अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून शपथ घेऊन आता फक्त आठवडाच झाला आहे, परंतु यादरम्यान त्यांच्या सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अमेरिकेत एच 1 बी व्हिसा धारक (H1B Visa Holders) असलेल्या भारतीयांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. बिडेन प्रशासनाने या महत्त्वपूर्ण निर्णयामध्ये, एच 1 बी व्हिसा धारक कर्मचार्‍यांच्या त्यांच्या एच 4 व्हिसा धारक (H4 Visa Holders) जोडीदारास काम सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. ओबामा सरकारकडून एच 4 वर्क परमिटवर काम करण्यास परवानगी दिल्यावर, ट्रम्प सरकारने त्यावर स्थगिती प्रस्तावित केली होती. यामुळे गेल्या चार वर्षांपासून एच-4 व्हिसा धारकांवर अनिश्चिततेची तलवार टांगली गेली होती.

पूर्वी, माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या शासनकाळात एच 1 बी धारकांच्या जोडीदाराला अमेरिकेत चार वर्षे घालवल्यानंतर त्यांना आणखी काम करण्याची परवानगी मिळणार की नाही याबद्दल शंका होती. आता बिडेन प्रशासनाच्या निर्णयाने ती भीती संपुष्टात आली आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी एच 1 बी व्हिसाधारकांच्या जोडीदारास अमेरिकेत काम करण्यास परवानगी देणारा कायदा मंजूर केला होता.

एच-4 व्हिसा अमेरिकन नागरिकत्व व इमिग्रेशन सर्व्हिसेसद्वारे एच-1 बी व्हिसाधारकांच्या कुटुंबातील सदस्यांना (पती-पत्नी आणि 21 वर्षाखालील मुलांना) दिला जातो. एच-1 बी व्हिसा धारक बहुतेक भारतीय आयटी व्यावसायिक आहेत. अमेरिकेत मोठ्या प्रमाणात भारतीय सॉफ्टवेअर अभियंते काम करतात, या निर्णयामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे. आर्थिक वर्ष 2019 मध्ये, एच ​​1 बी व्हिसासाठी 74% अर्ज भारतीयांचे होते आणि 11.8% अर्ज चिनी नागरिकांकडून आले होते. (हेही वाचा: अमेरिकेचे नवे अध्यक्ष Joe Biden अ‍ॅक्शन मोडमध्ये; पहिल्याच दिवशी Donald Trump यांचे निर्णय मोडीत काढून घेतले काही महत्वाचे निर्णय)

अमेरिकेतील 60 खासदारांच्या गटाने नवनिर्वाचित अध्यक्ष जो बिडेन यांना व्हिसासंदर्भात मागील ट्रम्प प्रशासनाचे धोरण बदलण्याची विनंती केली होती. खासदारांनी एच-4 व्हिसा घेणार्‍या लोकांच्या कागदपत्रांच्या वैधतेची मुदतवाढ करण्याची विनंती केली होती.