जो बिडेन (Joe Biden) यांनी काल अमेरिकेचे 46 वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली, तर भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांनी उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर बिडेन डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचे काही निर्णय बदलतील असे भाकीत आधीच वर्तवण्यात आले होते. आता कार्यभार स्वीकारल्यानंतर बिडेन एक्शन मोडमध्ये आले आहेत. शपथ घेतल्यानंतर लगेचच, त्यांनी माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे काही निर्णय काढून अनेक नवीन निर्णय घेतले. अशाप्रकारे बर्याच दिवसांपासून मागणी होत असलेल्या अनेक निर्णयांवर त्यांनी सही केली.
शपथ घेतल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी एक महत्वाचे ट्विट केले आहे, ज्यामध्ये ते म्हणतात- ‘शपथ घेतल्यानंतर मला पुढील गोष्टींवर कृती करण्याचा अधिकार मिळाला आहे- साथीचे नियंत्रण, आर्थिक मदत, हवामान बदल आणि वंश समानता.’ बिडेन यांनी आधीच सांगितले होते की सत्तेत आल्यावर ते प्रथम देशवासियांच्या हिताशी संबंधित विषयांवर काम करतील आणि ट्रम्प यांच्या कार्यकाळात घेतलेले चुकीचे निर्णय बदलतील.
- व्हाईट हाऊसमध्ये येताच जो बिडेन यांनी कोरोना विषाणूविरूद्ध पहिला निर्णय घेतला. आपल्या निर्णयात ते म्हणाले की 100 दिवसांसाठी मास्क घालणे बंधनकारक आहे.
- राष्ट्रपती बिडेन यांनी हवामान बदलाबाबत निर्णय घेतला आहे की, अमेरिका पुन्हा एकदा पॅरिस हवामान करारामध्ये सामील होईल. गेल्या वर्षी अमेरिका या करारामधून बाहेर पडली होती.
- अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी पुन्हा एकदा डब्ल्यूएचओमध्ये (WHO) सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना संकटाच्या वेळी तत्कालीन अध्यक्ष ट्रम्प यांनी डब्ल्यूएचओमधून माघार घेण्याचे ठरविले होते.
- बिडेन यांनी मेक्सिकोच्या सीमेवरील आणीबाणीची घोषणा मागे घेतली असून, सीमेवर भिंत बांधण्याचा आणि अर्थसहाय्य देण्याचा निर्णयही थांबविला आहे.
- अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी मुस्लिम देशांवरील इमिग्रेशन बंदी उठविली आहे. ट्रम्प यांच्या धोरणांमुळे प्रभावित देशांसाठी व्हिसा प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याच्या सूचना बिडेन यांनी परराष्ट्र मंत्रालयाला दिल्या.
- रोजगार-आधारित ग्रीन कार्डसाठी सर्व देशांना असणारी मर्यादा संपवण्यात आली आहे. बिडेन यांच्या या निर्णयाचा फायदा अमेरिकेतील हजारो भारतीय आयटी व्यावसायिकांना होणार आहे.
- बिडेन नवीन इमिग्रेशन योजना आणणार आहेत. या योजनेनुसार अमेरिकेत कागदाविना राहणाऱ्या लाखो स्थलांतरितांना अमेरिकन नागरिकत्व देण्याचा मार्ग मोकळा होईल.
- बिडेन यांनी कीस्टोन एक्सएल पाइपलाइनच्या विस्तारावर बंदी घातलेल्या आदेशावर शिक्कामोर्तब केले आहे. कीस्टोन एक तेल पाइपलाइन आहे जी अल्बर्टा प्रांतापासून अमेरिकेच्या इलिनॉय, ओक्लाहोमा आणि टेक्सास राज्यांमध्ये कच्च्या तेलाची वाहतूक करते. (हेही वाचा: Donald Trump Impeached: दोनदा महाभियोगाची कारवाई होणारे डॉनल्ड ट्रम्प अमेरिकेच्या इतिहासातील पहिलेच राष्ट्राध्यक्ष)
असे काही महत्वाचे निर्णय बिडेन यांनी पहिल्याच दिवशी घेतले आहेत. दरम्यान, शपथविधी दरम्यान बिडेन यांनी आपल्या भाषणात वांशिक भेदभाव संपवण्याविषयीही भाष्य केले. ते म्हणाले, ‘लोकशाहीला बळकटी देताना आता ऐक्याने पुढे जाण्याची वेळ आली आहे. अमेरिका एक महान देश आहे.’