Jet Ski Accident | Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Florida Jet Ski Accident: अमेरिकेतील इंडियाना शहरातील पर्ड्यू युनिव्हर्सिटी (Purdue University) मध्ये आरोग्य माहितीशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेत असलेल्या 27 वर्षीय तरुणाचा मृत्यू (Telangana Man Killed In US) झाला आहे. व्यंकटरमण पित्ताला (Venkataramana Pittala) असे त्याचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, जेट स्की अपघातात त्याचा मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे पर्ड्यू विद्यापीठात भारतीय विद्यार्थ्यांचा अपघाती, गूढ मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ नाही. या आधीही या विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या अनेक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकात विद्यापीठातील भारतीय वंशांच्या विद्यार्थ्यांचा अशा प्रकारचा मृत्यू होण्याच्या घटना वारंवार का घडतात याबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पर्ड्यू विद्यापीठात वर्षाच्या (2024) सुरुवातीपासून अमेरिकेत किमान आठ मृत्यूची नोंद झाली आहे. फ्लोरिडामध्ये घडलेल्या ताज्या घटनेमुळे अनेक तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. वेंकटरामन पित्तला हा 27 वर्षीय विद्यार्थी तेलंगणाचा रहिवासी होता. फ्लोरिडामध्ये मनोरंजन म्हणून जेट स्कीचा आनंद घेत असताना त्याचा जीवघेणा अपघात झाला. तो इंडियाना युनिव्हर्सिटी-पर्ड्यू युनिव्हर्सिटी इंडियानापोलिस (IUPUI) मध्ये पदव्युत्तर पदवी पूर्ण करण्याच्या अंतिम टप्प्यात होता. शनिवारी, 9 मार्च रोजी जेट स्की अपघातात तो गंभीर जखमी झाला. ज्यात त्याचा दुर्दैवी अंत झाला. (हेही वाचा, Indian-Origin Student Found Dead: भारतीय वंशाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू, यूएसमधील जंगलात सापडला मृतदेह; वर्षभरातील चौथी घटना)

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, ही दुर्दैवी घटना विस्टेरिया आयलँडजवळील फ्युरी प्लेग्राउंडवर (स्थानिक वेळेनुसार) दुपारी दीडच्या सुमारास घडली. पित्ताला याच्या जेट स्कीचा दुसऱ्या एका जेट स्की सोबत टक्कर झाली. ही जेट स्की एक 14 वर्षांचा मुलगा चालवत होता. या धक्कादायक अपघातात हा मुलगा वाचला मात्र, पित्ताला याचा मृत्यू झाला. तेलंगणातील काझीपेट येथील राहणारा, पित्तालाचा आशादायक शैक्षणिक प्रवास मे महिन्यात सुरु झाला. यूएसमध्ये उच्च शिक्षण घेण्यापूर्वी, पित्तला यांनी आंध्र प्रदेशातील प्रतिष्ठित एनटीआर आरोग्य विज्ञान विद्यापीठातून फिजिओथेरपीमध्ये बॅचलर पदवी प्राप्त केली होती.  (हेही वाचा, Indian Student Found Dead In US: बेपत्ता भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठ कॅम्पसमध्ये आढळला: रिपोर्ट)

जेट स्कीचा अपघात झाल्यानंतर फ्लोरिडातील वॉटरक्राफ्ट नियंत्रित करणाऱ्या सुरक्षा नियमांचा पुन्हा अभ्यास करण्याची मागणी केली जात आहे. फ्लोरिडा फिश अँड वाइल्डलाइफ कॉन्झर्व्हेशन कमिशनच्या नियमानुसार राज्यात वैयक्तिक वॉटरक्राफ्ट चालवण्यासाठी 14 वर्षांची किमान वयाची अट नमूद आहे. दरम्यान, भारतीय विद्यार्थ्यांच्या अपघातांच्या घटना आणि मृत्यूमध्ये होणारी वाढ पाहता, या घटनांच्या चौकशीची मागणी केली जात आहे. या आधीही अनेक वेळा अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे पर्ड्यु विद्यापीठ वेगळ्या घटनांसाठी चर्चेत येऊ लागले आहे.