Japan: रुग्णालयाचा निष्काळजीपणा! तब्बल 30 वर्षे पिण्यासाठी वापरले शौचालयासाठी असलेले पाणी; उपाध्यक्षांनी मागितली जाहीर माफी
Representational Image (Photo Credits: Pixabay)

जपानमध्ये (Japan) रुग्णांच्या जीवाशी खेळल्याचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. Yomiuri Shimbun च्या अहवालानुसार, जपानमधील एका रुग्णालयाने चुकून शौचालयासाठी (Toilet) प्रक्रिया केलेले पाणी जवळपास 30 वर्षे पिण्याचे पाणी म्हणून वापरले. ही घटना गेल्या महिन्यात समोर आली होती, त्यानंतर ओसाका विद्यापीठाचे संशोधक आणि रुग्णालयाचे उपाध्यक्ष Kazuhiko Nakatani यांनी माफी मागितली होती. जपानी न्यूज आउटलेट्सनुसार, हे रुग्णालय ओसाका विद्यापीठात आहे. रुग्णालयाची इमारत मेडिसिन फॅकल्टीशी संलग्न आहे.

महत्वाचे म्हणजे हे पाणी जवळजवळ 120 नळांमधून बाहेर पडत होते. हे पाणी हात-पाय धुण्यासोबत पिण्यासाठीदेखील वापरले जायचे. 1993 मध्ये जेव्हा हॉस्पिटल बांधले गेले तेव्हा पाईपच्या जोडणीमध्ये बिघाड झाल्याने ही समस्या निर्माण झाली होती. जपानी मीडिया आउटलेटच्या वृत्तानुसार, हॉस्पिटल व्यवस्थापनाने जेव्हा नवीन जल प्रक्रिया प्रकल्पाचे बांधकाम सुरू केले तेव्हा ही घटना उघडकीस आली. रुग्णालयात असा प्रकार घडत आहे याची कोणाला कल्पनाही नव्हती. नवीन प्लांटच्या बांधकामादरम्यान करण्यात आलेल्या तपासणीत या घटनेची माहिती समोर आली.

सध्या विद्यापीठ या प्रकरणाची चौकशी करत आहे. पाण्याची गुणवत्ताही सतत तपासली जात आहे व आतापर्यंत त्यामध्ये कोणतेही आरोग्यास घातक पदार्थ असल्याचे समोर आले नाही. 2014 पासून दर आठवड्याला पाण्याची रंग, चव आणि गंध तपासण्याबाबतच्या नोंदीही उपलब्ध आहेत. त्यामधूनही काही चिंतेची बाब समोर आली नाही. नकाटणी यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत याप्रकरणी माफी मागितली. अहवालानुसार ते म्हणाले की, एका प्रगत वैद्यकीय सेवा देणाऱ्या युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये पाण्याबाबत लोकांमध्ये चिंता व्हावी, याचे मला खूप वाईट वाटते. (हेही वाचा: The boy born with a TAIL: ब्राझीलमध्ये जन्मले शेपटीवाले बाळ, डॉक्टर्स आश्चर्यचकीत)

Yomiuri Shimbun च्या वृत्तानुसार, या कॉम्प्लेक्समध्ये 100 हून अधिक इमारती आहेत ज्या साधारण एकाच ठिकाणाहून एकाच प्रकारे प्रक्रिया केलेले पाणी वापरतात. आता रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की ते पाइपिंग तपासतील आणि त्यातील दोष दुरुस्त करतील. जपानमध्ये असा निष्काळजीपणा समोर आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे, कारण आरोग्याच्या बाबतीतील इतकी मोठी चूक अशा विकसित देशात सर्रास पाहायला मिळत नाही.