Photo Credit- X

Bangladesh: कोलकाता इस्कॉनकडून सांगण्यात आले की, शनिवारी बांगलादेशी अधिकाऱ्यांनी दोन भिक्षूंना अटक केली. आदिपुरुष श्याम दास (Adipurush Shyamdas) आणि रंगनाथ दास (Ranganath Das) ब्रह्मचारी अशी अटक केलेल्या भिक्षूंची नावे आहेत. संत चिन्मय कृष्ण दास (Chinmoy Krishna Das) यांना 25 नोव्हेंबर रोजी देशद्रोहाच्या आरोपाखाली बांगलादेशी पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. त्यावर आता हे नवे प्रकरण समोर आले आहे.

इस्कॉन कोलकाताच्या उपाध्यक्ष राधा रमण यांनी सांगितले की, '29 नोव्हेंबर रोजी आदिपुरुष श्याम दास आणि रंगनाथ दास ब्रह्मचारी चिन्मय कृष्ण प्रभू यांची भेट घेऊन परतत असताना पोलिसांनी त्यांना अटक केली. आदिपुरुष श्याम दास हे चिन्मय कृष्ण दास यांचे सचिवही आहेत. दंगलखोरांनी बांगलादेशातील इस्कॉन मंदिराचीही तोडफोड केल्याचे म्हटले आहे. अशा घटना थांबत नाहीत. त्यामुळे आम्हाला असहाय्य वाटत आहे.

रामन यांनी इस्कॉनचे अनुयायी आणि भाविकांना बांगलादेशातील अल्पसंख्याकांसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले. 25 ऑक्टोबर रोजी चितगावमध्ये बांगलादेशमध्ये भगवा फडकवल्याबद्दल अध्यात्मिक गुरु चिन्मय कृष्ण दास यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दास यांच्या अटकेनंतर, 27 नोव्हेंबर रोजी चितगाव कोर्ट बिल्डिंग परिसरात पोलिस आणि अनुयायांमध्ये झालेल्या संघर्षात एका वकिलाचा मृत्यू झाला. यावर परराष्ट्र मंत्रालयाने ही त्यांचा मुद्द मांडला आहे. भारताने बांगलादेश सरकारकडे हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांवर होत असलेल्या लक्ष्यित हल्ल्यांचा मुद्दा सातत्याने आणि जोरदारपणे उचलून धरला आहे.