Iran Hijab Row: हिजाब न घातल्यास 49 लाखांचा दंड, पासपोर्टही होऊ शकतो जप्त; इस्लामिक देश इराणमध्ये नवा कायदा
Hijab | Representational Image | (Photo Credits: Wikimedia Commons)

कठोर इस्लामिक कायदे असलेल्या इराणमध्ये (Iran) गेल्या अनेक महिन्यांपासून महिला त्यांच्या हक्कांसाठी लढत आहेत. अशात आता या देशाने नवीन कायद्याद्वारे त्यांच्या अडचणी वाढवल्या आहेत. इराणच्या संसदेने महिलांच्या ड्रेस कोडबाबत नवा कायदा केला आहे. या कायद्यानुसार महिलांनी हिजाब (Hijab) न घातल्यास त्यांना 49 लाख रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागू शकतो. माध्यमांनी इराणचे खासदार होसेनी जलाली यांचा हवाला देऊन इराणच्या नवीन कायद्यातील या तरतुदींना पुष्टी केली आहे.

अहवालानुसार जलाली म्हणाले की, दंडाव्यतिरिक्त, जर मुली आणि महिलांनी नवीन ड्रेस कोडचे पालन केले नाही म्हणजेच हिजाब परिधान केला नाही तर, त्यांचे पासपोर्ट जप्त केले जातील. यासोबतच त्यांच्या इंटरनेट वापरावरही बंदी घालण्यात येणार आहे. इराणमध्ये गेल्या 6 महिन्यांपासून हिजाबच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांसाठी हा नवा कायदा मोठा धक्का आहे.

इराणमध्ये महसा अमिनी नावाच्या महिलेचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्यामुळे मोठी निदर्शने सुरू झाली, ही घटना सप्टेंबर 2022 ची आहे. या घटनेविरोधात इराणची राजधानी तेहरानसह अनेक मोठ्या शहरांमध्ये महिला रस्त्यावर उतरल्या आहेत. या घटनेनंतर इराणमध्ये खुल्या विचारांच्या महिला आणि मुली हिजाब परिधान करण्याच्या विरोधात लढत आहेत. एका अहवालानुसार, इराणमधील निदर्शने आता 140 शहरांमध्ये पसरली आहेत.

यादरम्यान पोलीस आणि कट्टरवाद्यांनी अनेक मुलींची हत्या केली आहे. इराणमध्ये हिजाबविरोधी आंदोलनांमध्ये 18 वर्षांखालील अनेक तरुणांचा मृत्यू झाला आहे. मुली आणि महिलांच्या वाढत्या निदर्शनांमुळे इराण सरकारसमोर नव्या समस्या उभ्या राहिल्या आहेत. अशात आता देशात हिजाब घालण्याबाबत नवा कायदा करण्यात आला आहे. (हेही वाचा: 3,000 Years In Prison: अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला ठोठावली 3,000 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा)

इराणमधील इस्लामिक कायदे आणि नियमांच्या नावावर असलेल्या धर्मांधतेचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांचे निकटवर्तीय मोहम्मद मेहदी होसेनी यांनी सांगितले होते की, स्त्रिया हिजाब घालत नाहीत म्हणून पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. महिलांनी हिजाब घातला तर अल्लाह पाऊस पाडेल.