Coronavirus: कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे (International Flights) 14 एप्रिलपर्यंत बंद राहणार आहेत. नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) यासंदर्भात सुचना दिल्या आहेत. केंद्र सरकारने यापूर्वी देशांतर्गत विमान उड्डाणे 31 मार्च पर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, कोरोना व्हायरसचा धोका पाहता सर्व आंतरराष्ट्रीय विमान सेवा 14 एप्रिल बंद असणार आहेत. देशातील लॉकडाऊन संपल्यानंतर या सेवा सुरु करण्यात येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या संदर्भात 'डीजीसीए'चे उपमहासंचालक सुनील कुमार यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ चालवणाऱ्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड (मिआल) या कंपनीला यासंदर्भात माहिती दिली आहे. लॉकडाऊन काळात सर्व आंतरराष्ट्रीय विमानसेवा व व्हिसासेवा 14 एप्रिलपर्यंत बंद असणार आहेत. मात्र, यात केवळ अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या तसेच आंतरराष्ट्रीय कार्गोसेवा सुरू असणार आहेत, असंही नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने सांगितलं आहे. (हेही वाचा - Corona Update: महाराष्ट्रात आणखी 5 नवे रुग्ण आढळले; राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 130 वर)
सध्या संपूर्ण देशात कोरोना व्हायरसने धुमाकुळ घातला आहे. भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 600 हून अधिक झाली आहे. तसेच राज्यातदेखील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत राज्यात 130 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना जीवघेणा विषाणू असला तरी राज्यात जवळपास 45 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे सर्व कोरोनाग्रस्त रुग्णांना या बातमीमुळे दिलासा मिळत आहे.