जकार्ता : इंडोनेशियातील सुलावेसी बेटावर शुक्रवारी (28 सप्टेंबर) ला भुकंपाचा जोरदार धक्का बसला. या भुकंपाची तीव्रता 7.5 रिश्टर स्केल इतकी होती. भुकंप झाल्यानंतर काही वेळातच सुनामीचा जोरदार फटका बसला. सुनामीमुळे समुद्रकिनाऱ्याजवळील इमारती आणि लोकवस्ती उद्धवस्त झाल्या.
अचानक आलेल्या या आपत्तीमुळे लोक घाबरुन सैरावैरा पळू लागले. या नैसर्गिक आपत्तीत 384 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.आपत्ती व्यवस्थापन संस्थेच्या रिपोर्टनुसार, 6.0, 7.4 आणि 6.1 तीव्रतेचे भुकंपाचे हादरे बसले. त्यात 350 लोक जखमी झाले.
Indonesia quake-tsunami death toll jumps to 384, reports AFP quoting disaster agency.
— ANI (@ANI) September 29, 2018
आपत्ती व्यवस्थापन संस्थेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, "जखमींना ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसंच भुकंप आणि सुनामी पीडितांच्या मदतीला सैनिक, पोलिस, आपत्ती व्यवस्थापन संस्थेचे स्वयंसेवक धावून आले." इंडोनेशिया हा देश भुकंपप्रवण भागात असल्याने तिथे भूंकपाचे हादरे वारंवार बसत असतात.