भारतात पाकिस्तानपेक्षाही उपासमारीची परिस्थिती गंभीर: ग्लोबल हंगर इंडेक्स रिपोर्ट
Hunger (Photo Credits: Pixabay)

मोदी सरकार आले असले तरीही भारतात अजूनही कित्येक भागात भूकबळी आणि उपासमारीची परिस्थिती कायम आहे. नुकत्याच ग्लोबल हंगर इंडेक्सने (Global Hunger Index) केलेल्या सर्वेक्षणानुसार, भारतात (India) उपासमारीची समस्या अधिक गंभीर असल्याचे समोर आले आहे. 117 देशांच्या यादीत भारत 102 व्या स्थानावर जाऊन पोहोचला आहे. इतर देशांच्या तुलनेत हा या यादीतील सर्वात खालचा क्रमांक आहे. दक्षिण आशियातील इतर देश हे 66 ते 94 व्या स्थानावर आहे. तर पाकिस्तान देखील या यादीत 94 व्या स्थानावर आहे.

ग्लोबल हंगर इंडेक्स हे दरवर्षी जगभरातील सर्व देशांचा सर्वे करतात त्यात कोणकोणत्या देशात उपासमारीची काय स्थिती आहे हे पाहिले जाते आणि त्यानुसार त्यांचे वर्गीकरण करण्यात येते. 2015 च्या ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारत 93 व्या क्रमांकावर होता. त्यावेळी भारताच्याही मागे असलेल्या पाकिस्तानने यंदाच्या यादीत भारताला मागे टाकत 94 वे स्थान पटकावले आहे. विविध देशांमधील कुपोषित मुलांची लोकसंख्या, वजनाखालील किंवा त्यापेक्षा कमी वयाखालील मुलांची टक्केवारी आणि बालमृत्यू दर यावर आधारीत ही आकडेवारी आहे.

हेदेखील वाचा- #WorldFoodDay : अन्नाची नासाडी टाळत #ZeroHunger चं ध्येय गाठण्यासाठी या 5 सवयी करतील मदत

भारतात 6 ते 23 महिन्यांच्या 9.6 टक्के मुलांनाच पुरेसं अन्न मिळतं. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालात ही आकडेवारी केवळ 6.4 टक्केच आहे. तर भारताच्या तुलनेत नेपाळमध्ये 2000 पासून सर्वाधिक सुधारणा झाली आहे, असं जागतिक अहवालात म्हटलंय.

हवामान बदलामुळे उपासमारीचे संकट वाढत आहे. जागतील अनेक भागांमध्ये उपासमारीचे प्रमाण वाढत आहे. तसंच अन्नाची गुणवत्ता आणि स्वच्छतेवरही विपरीत परिणाम होतोय. तसंच शेती उत्पादनातील पोषक घटकांचं प्रमाणही कमी झालंय.