Foreign Minister S Jaishankar, Chinese Foreign Minister Wang Yi (PC - ANI)

India China Border Tension: गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीन सीमेवर तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे. भारताकडून चीनच्या कुरापती कमी करण्यासाठी नेहमी प्रयत्न सुरू होते. त्यामुळे लडाखमधील तणाव कमी करण्यासाठी भारत आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक पार पडली. सीमेवरील तणाव संपुष्टात आणण्यासाठी भारतीय परराष्ट्रमंत्री एस जयशंकर (Foreign Minister  S Jayshankar) आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी (Chinese Foreign Minister Wang Yi) यांच्यात बैठकीमध्ये 5 मुद्द्यांवर सहमती झाली.

या बैठकीत एस जयशंकर यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यात दोन तास चर्चा झाली. यात सीमेवरील तणावासंदर्भात भारत-चीनमध्ये चर्चा सुरू राहणार असून सैनिकांची संख्या कमी करण्याच्या प्रक्रियेतही गती देण्यात येईल, यासंदर्भात चर्चा झाली. रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये ही बैठक पार पडली. या बैठकीत दोन्ही देशामध्ये 5 मुद्द्यांवर सहमती झाली. (हेही वाचा - India-China Tensions: भारतीय लष्कराने LAC पार केल्याचा चीनचा दावा; लदाख मध्ये Pangong Tso Lake जवळ 'Warning Shots' झाडल्याचादेखील आरोप)

परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही देशांमधील मतभेदांचे रुपांतर वादात होऊ न देण्यासह भारत-चीन संबंध विकसित करण्यासाठी दोन्ही बाजूंनी आपापल्या नेत्यांचे मार्गदर्शन घ्यावे, यावर दोन्ही मंत्र्यामध्ये चर्चा झाली. या बैठकीत भारत-चीन सीमेवरून दोन्ही देशांच्या संबंधांवर झालेल्या परिणामांची स्पष्टपणे चर्चा करण्यात आली.

दरम्यान, सीमावर्ती भागातील सद्यस्थिती कोणत्याही बाजूच्या हिताची नाही. त्यामुळे दोन्ही बाजूंच्या सीमेच्या सैन्याने आपला संवाद सुरु ठेवावा. सैनिकांना सीमेवरून हटवण्याच्या प्रक्रियेत गती आली पाहिजे आणि तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत, असा मुद्दादेखील बैठकीत मांडण्यात आला. भारत-चीन दरम्यान अशा कोणत्याही समस्या आणि आव्हानं नाहीत की, जी दूर केली जाऊ शकत नाही, असं चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलं आहे.

तणावपूर्ण परिस्थिती कमी झाल्यानंतर सीमाभागात शांतता राखण्यासाठी, एकमेकांचा विश्वास पुन्हा संपादन करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात याव्यात, असंही बैठकीत ठरवण्यात आलं. याशिवाय दोन्ही देशांच्या सीमावर्ती भागात तणाव वाढू नये. तसेच चीनबाबत भारताने कोणत्याही धोरणात बदल केला नाही, असंही यावेळी जयशंकर यांनी स्पष्ट केलं.