India-China Complete Disengagement: भारत (India) आणि चीनमधील (China) महत्त्वपूर्ण करारानंतर, एलएसीवरील (LAC) तणाव कमी होऊ लागला आहे. पूर्व लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेवरील (LAC) दोन डेडलॉक पॉइंट्स- डेमचोक आणि डेपसांग येथे सैन्य मागे घेतले आहे आणि लवकरच या पॉइंट्सवर गस्त सुरू होईल. भारतीय लष्कराच्या सूत्रांनी ही माहिती दिली. गुरुवारी दिवाळीनिमित्त दोन्ही पक्ष एकमेकांना मिठाई देणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली. सैन्य मागे घेतल्यानंतर, पडताळणीचे काम सुरू आहे आणि ग्राउंड कमांडर्समधील चर्चेद्वारे गस्तीचे स्वरूप निश्चित केले जाईल. याआधी 25 ऑक्टोबरला सूत्रांनी सांगितले होते की, 28 ते 29 ऑक्टोबरपर्यंत सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे.
माहितीनुसार, कराराच्या रुपरेषेवर आधी राजनैतिक स्तरावर स्वाक्षरी करण्यात आली आणि त्यानंतर लष्करी पातळीवर चर्चा झाली. कॉर्प्स कमांडर स्तरावरील चर्चेदरम्यान कराराच्या तपशीलांवर काम करण्यात आले. दोन्ही बाजूंमधील करारानंतर या भागात तैनात सैनिकांनी आपली उपकरणे हटवण्यास सुरुवात केली. याआधी बुधवारी चीनने सांगितले की, चीन आणि भारतीय सैन्याने पद्धतशीरपणे एलएसीवरील सैन्य मागे घेतले आहे.
एलएसीवर गस्तीबाबत भारत आणि चीन यांच्यात झालेल्या करारावर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी 27 ऑक्टोबर रोजी सैन्य मागे घेणे ही पहिली पायरी असल्याचे सांगितले होते. पुढील पायरी म्हणजे तणाव कमी करणे. हा तणाव तेव्हाच कमी होईल जेव्हा भारताला खात्री होईल की चीनलाही तेच हवे आहे. तणाव कमी झाल्यानंतर सीमेचे व्यवस्थापन कसे करायचे यावर चर्चा केली जाईल. पूर्व लडाखमधील सीमावादावरून भारत आणि चीनमध्ये चार वर्षांपासून तणाव होता. दोन वर्षांच्या प्रदीर्घ वाटाघाटीनंतर नुकताच एक करार झाला आहे. त्यानुसार, डेपसांग आणि डेमचोक या वादग्रस्त बिंदूंवरून दोन्ही सैन्याने माघार घेतली आहे. (हेही वाचा: Canada Immigration Policy: कॅनडाच्या Justin Trudeau सरकारने केले इमिग्रेशन धोरणात मोठे बदल; स्थलांतरितांची संख्या होणार कमी, जाणून घ्या भारतीयांवर काय परिणाम होणार)
जून 2020 मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या भीषण चकमकीनंतर दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता. गेल्या काही दशकांतील दोन्ही बाजूंमधील हा सर्वात प्राणघातक लष्करी संघर्ष होता. त्यानंतर आता हा तणाव कमी होत आहे. आता भारतात दिवाळीचा सण साजरा होत असताना, दोन्ही देशांमध्ये मिठाईची देवाणघेवाण होणार आहे. सूत्रांनी सांगितले की, भारत आणि चीनदरम्यान 6 बॉर्डर पर्सनल मीटिंग पॉईंट्स (BPM) वर मिठाईची देवाणघेवाण केली जाईल.