इम्रान खान आणि नरेंद्र मोदी (Photo Credits: Twitter/@IndianMEA)

पाकिस्तान, आज म्हणजेच 23 मार्च रोजी राष्ट्रीय दिन (National Day) साजरा करीत आहे. या दिनानिमित्त नवी दिल्ली येथे आयोजित केल्या गेलेल्या कार्यक्रमामुळे मोठा गदारोळ माजला होता. त्यात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी पाकिस्तानला राष्ट्रीय दिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या असल्याचा दावा केला आहे. इम्रान खान यांनी ट्वीट करून या गोष्टीची माहिती दिली होती, त्यानंतर मात्र भारतीय राजकीय वर्तुळात या गोष्टीची चर्चा रंगू लागली. मात्र यावर ‘भारताच्या पंतप्रधानांनी इतर देशांच्या राष्ट्रीय दिवसनिमित्त किंवा राष्ट्रीय सणानिमित्त शुभेच्छा देणे हा औपचारिकतेचा भाग आहे’ असे स्पष्टीकरण भाजपने दिले आहे.

पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनानिमित्त दिल्ली येथील पाकिस्तानच्या दुतावासात एका कार्यक्रमाचे आयोजन केले गेले आहे. यासाठी पाकिस्तानने जम्मू काश्मीर येथील फुटीरतावादी नेत्यांना आमंत्रित केले होते, हे पाहून भारत सरकारने या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता. भारताकडून एकही प्रतिनिधी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार नाही अशी माहिती काल देण्यात आली होती. मात्र आता पीएम मोदी यांनी पाकिस्तानला अशा प्रकारे शुभेच्छा दिल्याने पंतप्रधानांवर टीका होत आहे.

(हेही वाचा: पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनावर भारताचा बहिष्कार; भारताकडून एकही प्रतिनिधी हजर राहणार नाही)

इम्रान खान यांनी काल याबाबत ट्वीट केले होते, ज्यामध्ये नरेंद्र मोदी यांचा संदेश नमूद करण्यात आला होता. ‘मी राष्ट्रीय दिवसाच्या पाकिस्तानला शुभेच्छा देतो. उपखंडातील लोकांनी दहशतवाद आणि भीतीपासून मुक्त होऊन लोकशाही आणि शांततेने प्रगतीसाठी काम करण्याची ही वेळ आहे.’ अशा प्रकारे नरेंद्र मोदी यांनी या शुभेच्छा दिल्या आहेत.