इम्रान खान आणि पीएम मोदी (Photo Credit-IANS)

पाकिस्तान आपला राष्ट्रीय दिन (Pakistan National Day) साजरा करण्याची तयारी करत आहे. यासाठी दिल्लीतील पाकिस्तानच्या दुतावासामध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी जम्मू काश्मीरच्या फुटीरतावादी नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. मात्र  या कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे भारताकडून एकही प्रतिनिधी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार नाही. पुलवामा हल्ल्यानंतर संपूर्ण जगभरातून पाकिस्तानवर टीका झाली. त्यानंतरही पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले यामुळे भारत पाकिस्तानवर नाराज आहे.

नवी दिल्ली येथे 23 मार्च रोजी संध्याकाळी पाकिस्तानकडून विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत आपला निर्णय देताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रविशकुमार म्हणाले, ‘भारत आणि पाकिस्तान या दोन्ही शेजारी देशांदरम्यान सध्या तणावाचे वातावरण आहे. मात्र, तरीही पाकिस्तानने काश्मीर खोऱ्यातील फुटिरतावादी आणि हुर्रियत नेत्यांना निमंत्रण दिले आहे. याचा भारताने तीव्र विरोध केला असून त्यासाठी भारतातील पाकिस्तानच्या उच्चायुक्तामध्ये होणाऱ्या कार्यक्रमाला आपला प्रतिनिधी हजेरी लावणार नाही.’

14 फेब्रुवारीला भारतीय जवानांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला होता, यामध्ये 40 पेक्षा अधिक जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारत-पाक या राष्ट्रांमध्ये तणाव निर्माण झाला. मात्र काश्मीर खोऱ्यातील अनेक फुटीरतावादी नेत्यांचा पाकिस्तानला पाठींबा असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता अशा नेत्यांना या कार्यक्रमाला निमंत्रित केले गेले असता भारताने या राष्ट्रीय दिन कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.