Donald Trump, Prime Minister Modi | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Illegal Indian Migrants in US: डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर तेथे बेकायदेशीरपणे राहणाऱ्या भारतीयांना (Illegal Migrants) आपल्या देशात परत पाठवण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. भारताने सूचित केले आहे की, सरकार डोनाल्ड ट्रम्प प्रशासनासोबत त्यांच्या सर्व नागरिकांची ओळख पटवून  त्यांना परत आणण्यासाठी काम करेल. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने ही माहिती दिली आहे. या प्रकरणाशी परिचित लोकांच्या मते, अमेरिकेने सुमारे 18,000 बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांची ओळख पटवली आहे, ज्यांना मायदेशी परत पाठवले जाणार आहे. सध्या अमेरिकेत किती अवैध भारतीय स्थलांतरित आहेत, याचा अचूक आकडा उपलब्ध नाही. अमेरिकेतील बेकायदेशीर स्थलांतरितांशी व्यवहार करणाऱ्या सरकारी संस्थेने (ICE) गेल्या महिन्यात बेकायदेशीरपणे अमेरिकेत राहणाऱ्या सुमारे 15 लाख लोकांची यादी तयार केली होती, ज्यामध्ये 18 हजार भारतीयांचा समावेश आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या अध्यक्षतेच्या पहिल्याच दिवशी बर्थराइट नागरिकत्व संपवण्याचे आणि अमेरिका-मेक्सिको सीमेवर सैन्य तैनात करण्याचे आदेश दिले होते. या धोरणामुळे अवैध स्थलांतरितांवर कारवाईला वेग आला आहे. भारत सरकार या धोरणात सहकार्य करत आहे. मात्र भारत आपल्या श्रमिक स्थलांतर धोरणांना इतर देशांमध्ये धक्का बसणार नाही, याची काळजी घेत आहे. देशांतर्गत रोजगारांच्या समस्यांना तोंड देण्यासाठी भारताने तैवान, सौदी अरेबिया, जपान आणि इस्त्राईल यांसारख्या देशांशी स्थलांतर करार केले आहेत. या करारांमुळे भारतीय श्रमिकांना अधिक संधी उपलब्ध होत आहेत.

अमेरिकेत अवैध स्थलांतरितांपैकी केवळ 3% भारतीय आहेत, असे 2024 आर्थिक वर्षासाठीचे अमेरिकी सीमाशुल्क आणि सीमा सुरक्षा विभागाचे आकडे सांगतात. मात्र, 2022 च्या अहवालानुसार, सुमारे 220,000 अवैध भारतीय स्थलांतरित अमेरिकेत राहात होते. भारत-अमेरिका स्थलांतर धोरण सहकार्यामुळे कायदेशीर स्थलांतरासाठी मार्ग मोकळा होऊ शकतो. मात्र, अवैध स्थलांतरितांचा मुद्दा योग्य प्रकारे हाताळला गेला नाही, तर दोन्ही देशांमधील व्यापार आणि श्रमिक स्थलांतर धोरणांवर परिणाम होऊ शकतो. (हेही वाचा: Donald Trump Executive Orders: अमेरिका WHO मधून बाहेर, TikTok ला दिलासा, बिडेन प्रशासनाचे निर्णय रद्द; डोनाल्ड ट्रम्प यांची पहिल्याच दिवशी अनेक कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी)

अमेरिकेत बेकायदेशीरपणे प्रवेश करण्यात पश्चिम भारतातील विशेषत: पंजाब आणि गुजरातमधील तरुण आघाडीवर आहेत. दरम्यान, बेकायदेशीर नागरिकांच्या मुद्द्याचा H-1B व्हिसा आणि विद्यार्थी व्हिसा सारख्या कार्यक्रमांवर परिणाम होऊ नये अशी भारताची इच्छा आहे. यूएस सरकारच्या आकडेवारीनुसार, 2023 मध्ये 3,86,000 लोकांना H-1B व्हिसा मंजूर करण्यात आला, त्यापैकी सुमारे तीन चतुर्थांश भारतीय नागरिक आहेत.