Hurricane Ian In Florida, Video: इयान चक्रीवादळाचा फ्लोरिडाला तडाखा, मुसळधार पावसाने समुद्राला उधान; घरांना तरंगत्या बोटींचा गराडा, 23 बेपत्ता, पाहा व्हिडिओ
Hurricane Ian In Florida | (Photo Credit - Twitter)

फ्लोरिडाला इयान चक्रीवादळाचा (Hurricane Ian hits Florida) जोरदार तडाखा बसला आहे. ताज्या माहितीनुसार, इयान चक्रीवादळ (Hurricane Ian) फ्लोरिडा द्विप्रकल्पातून जात असताना काहीसे कमजोर झाले आहे. त्याचा वेग मंदावला असला तरी धोका अद्यापही टळला नाही. या प्रदेशात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे समुद्राला उधान आले आहे. त्यामुळे समुद्रात नांगरलेल्या बोटी तरंगू लागल्या आहेत. नांगरलेली जागा सोडून या बोटींचा परिसरातील घरांना गराडा पडला आहे. या वादळामध्ये 23 जण बेपत्ता झाल्याचेही वृत्त आहे. फ्लोरिडातील चक्रीवादळाचा एक व्हिडिओ ( Hurricane Ian Video) सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे.

फ्लोरिडा द्वीपकल्प ओलांडताना श्रेणी 2 चक्रीवादळाचा जोर काहीसा कमी झाला असता तरी अद्यापही काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. याशिवाय वेगवान वारे वाहण्याचे प्रमाण कायम राहण्याचा इशारा स्थानिक हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, वादळाने बाधित झालेल्या इमारती आणि वाहने समुद्रात तरंगत असल्याचे आढळून आले आहे. बुधवारी दुपारी उशिरा, इयान चक्रीवादळ, एक शक्तिशाली श्रेणी 4 चक्रीवादळ फ्लोरिडामध्ये धडकले आणि तांडव सुरु झाले.

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, फोर्ट मायर्स आणि केप कोरलच्या जवळ असलेल्या कायो कोस्टा बेटावर नैऋत्य किनार्‍यावर प्रति तास सुमारे 150 मैल वेगाने वारे वाहात होते. हाती आलेल्या शेवटच्या अद्ययावत माहितीनुसार, बुधवारी रात्रीपर्यंत 1.5 दशलक्षाहून अधिक लोकांच्या घरातील वीज गेली होती आणि फ्लोरिडाच्या पश्चिम किनारपट्टीवरील शहरांमध्ये कर्फ्यू पाहायला मिळत होता. (हेही वाचा, US: ऍपल वॉच हरवल्यानंतर $ 40,000 ची फसवणुक झाल्याचा महिलेचा दावा, पाहा काय आहे संपूर्ण प्रकरण)

व्हिडिओ

नॅशनल हरिकेन सेंटरच्या माहितीनुसार, फ्लोरिडा द्वीपकल्पातील वादळामुळे वादळी वारे आणि महापूर आला आहे. परिणामी लाखो लोकांना फ्लोरिडा द्वीपकल्प सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ट्विटरवर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये घरांजवळून तरंगणाऱ्या बोटींचा व्हिडिओ दिसत आहे. इयान चक्रीवादळाने कहर केला आहे आणि तो अजूनही कायम आहे.