काय सांगता? व्यक्तीने काढला होता 24 कोटींचा विमा; पैसे ताबडतोब मिळवण्यासाठी ट्रेनखाली कापून घेतले दोन्ही पाय
Insurance | Image Used for Representative Purpose Only | (Photo Credits: PTI)

आपले चांगले भविष्य सुनिश्चित करण्यासाठी बरेच लोक पैशांची गुंतवणूक करतात. काही लोक दागिने घेतात तर काही लोक घर, जमिनी घेतात. आपल्या आरोग्याच्या समस्या उद्भवल्यास जेव्हा हवी तेव्हा मदत मिळण्यासाठी काही लोक जीवन विमा (Life Insurance) घेतात. यासाठी हयात असताना भरपूर पैसे मोजावे लागतात, जेणेकरून भविष्यात काही अनुचित घटना घडल्यास विम्याची संपूर्ण रक्कम मिळू शकेल. मात्र याबाबत हंगेरीतून (Hungary) एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथे 24 कोटींच्या विम्याची रक्कम ताबडतोब मिळवण्याच्या लालसेपोटी एका व्यक्तीने आपले पाय कापून घेतले आहेत.

ऐकायला हे खूप विचित्र वाटेल, परंतु हे सत्य आहे. परंतु या व्यक्तीची युक्ती चालली नाही आणि त्याला पायांसह पैसेही गमवावे लागले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हंगेरीतील फसवणुकीचे हे प्रकरण 2014 चे आहे, परंतु आता हे उघड झाले आहे. सँडर नावाची ही व्यक्ती हंगेरीतील Nyircsaszari गावातील रहिवासी आहे. रेल्वे अपघातात त्याने आपले दोन्ही पाय गमावले. यानंतर त्याला बनावट पाय देण्यात आले. या भीषण अपघातानंतर सँडरने विमा कंपनीकडे त्याचे पैसे मागितले.

दाव्यानंतर, विमा कंपनी त्यांच्या वतीने एका फील्ड चेक करते आणि त्यानंतर विम्याची रक्कम धारकाला दिली जाते. सँडरच्या बाबतीतही असेच घडले. विमा कंपनीने पैसे देण्यापूर्वी या प्रकरणाची चौकशी केली. मात्र यादरम्यान असा प्रकार समोर आला ज्यामुळे फक्त विमा कंपनीचे अधिकारीच नव्हे, तर सँडरला ओळखणाऱ्यांनाही धक्का बसला. इन्शुरन्सचे पैसे मिळवण्यासाठी सँडरने जाणूनबुजून अपघात केल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर याबाबत विमा कंपनीने कोर्टात धाव घेतली होती. (हेही वाचा: कार्यलयीन वेळेनंतर आपल्या कर्मचाऱ्यांना फोन अथवा मेसेज करने राहणार अपराध; येथे वाचा संपूर्ण महिती)

निकाल देताना, जिल्हा न्यायालयाने सांगितले की, विम्याच्या पैशाच्या लालसेने सँडरला जाणून बुजून स्वतःचा अपघात करवला. विमा कंपनीने केलेल्या तपासणीत सँडरनेच चालत्या ट्रेनसमोर उडी मारल्याचे निष्पन्न झाले होते. विमा कंपनीच्या म्हणण्यानुसार, सँडरने 24 कोटी रुपयांचा विमा उतरवला होता. या पैशाच्या लोभापोटी त्याने मुद्दाम पाय कापून घेतले. सँडरने काही महिन्यांपूर्वीच याचा विमा काढला होता. या फसवणुकीसाठी सँडरला दोन वर्षांच्या कारावासासह 4 लाख 71 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.