सध्या पैसे किंवा नफा कमावण्यासाठी लोकांच्या जीवाशी खेळणे ही खूप सामान्य बाब झाली आहे. नुकतेच असे एक प्रकरण इंग्लंडमधून समोर आले आहे. येथे बनावट परफ्यूम (Fake Designer Perfumes) विकणाऱ्या काही लोकांना पोलिसांनी अटक केली. आश्चर्य म्हणजे हे लोक परफ्युमच्या नावाखाली चक्क मानवी मूत्र (Human Urine) विकत होते. हे परफ्युम डिझाईनर परफ्युम म्हणून लोकांच्या गळ्यात मारले जात होते. डेली स्टार न्यूज वेबसाइटच्या वृत्तानुसार, लंडन पोलिसांच्या इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी क्राईम युनिटने मंगळवारी मँचेस्टरमधील दोन व्यावसायिक मालमत्तांवर छापे टाकले.
पोलिसांनी या ठिकाणाहून सुमारे 400 बनावट परफ्यूमच्या बाटल्या जप्त केल्या. पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हे बनावट परफ्यूम अगदी हुबेहुब त्याच्या मूळ परफ्युमसारखे दिसत होते. मात्र त्यामध्ये सायनाइडसारखे अनेक विषारी रसायने आढळून आल्याचे प्रयोगशाळेतील चाचणीतून निष्पन्न झाले आहे. यासोबतच काही परफ्युममध्ये मानवी लघवीचे अंशही सापडले आहेत.
— My West London (@mywestldn) December 16, 2022
या प्रकारच्या परफ्यूममुळे मानवी शरीरात ऍलर्जी किंवा इतर प्रतिक्रिया देखील होऊ शकतात. यामुळे लोकांची चिडचिड होऊ शकते आणि काही परिस्थितींमध्ये जखमा देखील होऊ शकतात. या ठिकाणी परफ्युमसोबत जप्त करण्यात आलेल्या मस्करा, लिपग्लॉस आदी बनावट सौंदर्यप्रसाधनांमध्ये आर्सेनिक, पारा आणि शिसे मिसळले असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
(हेही वाचा: प्लास्टीकचा पाऊस, काय सांगता? खरोखरच? जाणून घ्या नेमकं काय घडतंय!)
या वर्षी जुलै महिन्यात साऊथपोर्ट टाऊन सेंटरमधून पोलिसांनी तीन तरुणांना मानवी मूत्र असलेल्या बनावट परफ्युमच्या बाटल्यांसह पकडले होते. पोलिसांनी त्यांना रेल्वे स्टेशनवर ब्रँडच्या बनावट बाटल्यांसह पकडले. ते दुकानदारांना जबरदस्तीने परफ्यूम विकत घेण्याचा आग्रह करत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीत सांगितले की, चाचणीनंतर परफ्यूममध्ये लघवीचे कण आढळून आले आणि ते पूर्णपणे बनावट असल्याचे दिसून आले.