
चीनमध्ये (China) नोकरीच्या फसवणुकीचा एक अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे, जिथे एका एचआर मॅनेजरने 22 बनावट कर्मचारी उभे करून सुमारे1.6 कोटी युआन (म्हणजे सुमारे 18 कोटी रुपये) कमावले. त्याने कंपनीत बनावट कर्मचारी नियुक्त केले आणि सुमारे 8 वर्षे त्यांचे पगार वसूल केले, परंतु नंतर एचआरची ही फसवणूक उघडकीस आली आणि आता त्याला शिक्षा सुनावण्यात आली आहे. या घोटाळ्यात पगारापासून ते इतर सुविधांसाठी मिळणारे पैसे अशा सर्व गोष्टींमध्ये हेराफेरी करण्यात आली.
एका अतिशय मेहनती कर्मचाऱ्याने संपूर्ण प्रक्रियेवर शंका उपस्थित केल्यानंतर हा घोटाळा उघडकीस आला. ही संपूर्ण घटना घडवून आणणारा व्यवस्थापक यांग चीनमधील शंखाई येथील एका कामगार सेवा कंपनीत काम करत होता.
अहवालानुसार, यांग टेक फर्मच्या कामगार सेवा कंपनीत वेतन पाहत असे. या काळात त्याला समजले की कंपनीत पगाराचे कोणतेही ऑडिट होत नाही आणि तिथे काम करणाऱ्या कामगारांवर आणि त्यांच्या पगारावर त्याचे पूर्ण नियंत्रण आहे. त्याने संधीचा फायदा घेतला आणि सन नावाच्या अस्तित्वात नसलेल्या कर्मचाऱ्याचे एक बनावट रेकॉर्ड तयार केले आणि त्याचा पगार आपल्या नियंत्रणाखालील बँक खात्यात पाठवायला सुरुवात केली. पुढे या व्यक्तीने असे 21 बनावट कर्मचारी तयार केले. हा प्रकार जवळजवळ 8 वर्षे सुरु होता. त्यानंतर कंपनीतील एका कर्मचाऱ्याला याबाबत शंका आली व त्याने कंपनीला याबाबत माहिती दिली. (हेही वाचा: Fake Job Offers: म्यानमारमधील 283 भारतीयांची सुटका; बनावट नोकरीचे आमिष दाखवून Cyber Crime मध्ये भाग पाडले होते)
चिनी माध्यमांनुसार, 2022 मध्ये टेक फर्मच्या वित्त विभागाने हा घोटाळा उघडकीस आणला होता. जेव्हा त्यांनी पेमेंट पाहिले तेव्हा आढळले की, सन नावाचा एक बनावट व्यक्ती दरमहा पगार घेत होता. पण कोणीही त्याला कामावर कधीच पाहिले नाही. अशा परिस्थितीत त्यांनी पगाराच्या नोंदी आणि बँक व्यवहार तपासले. ज्यामुळे ही फसवणूक उघडकीस आली. जेव्हा याबाबत यांगची चौकशी केली तेव्हा सुरुवातीलाव्हा त्याने आपली चूक मान्य करण्यास नकार दिला. मात्र सर्व पुरावे समोर आल्यावर त्याने हा घोटाळा मान्य केला. या घटनेनंतर पोलिसांनी यांगला अटक केली. या घोटाळ्याप्रकरणी यांगला 10 वर्षे आणि 2 महिने तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. त्याच्यावर दंडही ठोठावण्यात आला आहे. तसेच, पुढील 1 वर्षासाठी त्याचे सर्व राजकीय अधिकार काढून घेण्यात आले आहेत.