ब्रिटनच्या (UK-Based) अग्रगण्य समूहाच्या, हिंदुजा ग्रुपच्या (Hinduja Group) चार भावांमधील एका पत्रामुळे निर्माण झालेली कायदेशीर लढाई, इंग्लंडच्या उच्च न्यायालयात पोहोचली आहे. यामुळे कुटुंबाच्या 11.2 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 83 हजार कोटी रुपयांच्या संपत्तीवरुन वाद निर्माण झाला आहे. या लेटरवर 2 जुलै 1914 रोजी चार हिंदुजा बांधवांनी (Hinduja Brothers) सही केली होती आणि त्यात असे म्हटले आहे की, एका भावाकडे जी काही मालमत्ता आहे ती सर्वांची आहे. आता या कुटुंबातील सर्वात मोठे असे-84 वर्षीय श्रीचंद परमानंद हिंदुजा यांनी या पत्राच्या वैधतेवर प्रश्न उभा केला आहे. त्यांनी आपले भाऊ जीपी हिंदुजा (80 ), पीपी हिंदुजा (75) आणि एपी हिंदुजा (69) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
84 वर्षांचे श्रीचंद हिंदुजा आणि त्यांची मुलगी विनू यांनी या पत्राला ग्राह्य धरण्यास नकार दिला आहे. हिंदुजा कुटुंब हे ब्रिटनच्या अब्जाधीशांपैकी एक आहे. सहा वर्षांपूर्वीच्या पत्रात असे म्हटले आहे की, सर्व बंधू एकमेकांना त्यांचे वारस म्हणून नेमतील आणि कोण एका भावाच्या संपत्तीवर इतर भावांचा अधिकार असू शकतो. आता श्रीचंद परमानंद हिंदुजा यांनी उच्च न्यायालयात दाद मागताना, ही कागदपत्रे कायदेशीररित्या अकार्यक्षम घोषित करण्याचे आवाहन केले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, हा दस्तऐवज मृत्युपत्र, पॉवर ऑफ अटर्नी किंवा इतर कोणतेही बंधनकारक दस्तऐवज म्हणून वैध असू नये. याशिवाय या कागदपत्राचा वापर थांबविण्यासाठी सूचना देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. (हेही वाचा: सॅमसंगचा चीनला मोठा धक्का; 5 हजार कोटींच्या गुतंवणूकीसह उत्तर प्रदेशमध्ये उभारणार मोबाईल OLED डिस्प्ले प्रकल्प)
हायकोर्टाच्या चान्सरी विभागात या प्रकरणाची सुनावणी करत न्यायमूर्ती फॉक यांनी काही प्रमाणात गोपनीयतेचा आदेश देण्यास नकार दिला. दुसरीकडे, उर्वरित तिन्ही भावांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, कुटुंबातील ही अनेक दशकांपासूनची परंपरा आहे. जे काही कुटुंबात आहे ते सर्वांचे आहे, कोणा एकट्याचे नाही. निवेदनात म्हटले आहे की, या प्रकरणात पुढील सुनावणी झाल्यास ते कुटुंबातील तत्त्वांविरूद्ध असेल. आम्हाला आमच्या कुटुंबाच्या मूल्याचे रक्षण करायचे असल्याचे भावांनी सांगितले आहे. अशा परिस्थितीत जर तिन्ही भावांचा दावा मान्य केला गेला तर, श्रीचंद परमानंद हिंदुजा यांच्या नावे असलेली सर्व संपत्ती त्यांच्या मुलीशिवाय इतर कुटूंबाकडे जाईल.