एकेकाळी इराण (Iran) हा एक मुक्त समाज होता, परंतु देशात इस्लामिक कायदे लागू झाल्यानंतर आता परिस्थिती पूर्वीसारखी राहिली नाही. गेल्या काही महिन्यांपासून इराणमध्ये हिजाब (Hijab) वाद पेटलेला आहे. देशातील महिला हिजाब घालण्यास विरोध करत आहेत. मात्र आता प्रशासन हिजाब घालण्यास विरोध करणाऱ्यांना वेडे ठरवत आहे. एवढेच नाही तर शिक्षा म्हणून अशा महिलांना शवागारात मृतदेह स्वच्छ करवले जात आहे, यासह आठवड्यातून एकदा मानसिक डॉक्टरांकडे जाण्यास भाग पाडले जात आहे, जेणेकरून 'अशा महिलांना कौटुंबिक मूल्ये लक्षात राहतील' आणि हिजाब घालून सामाजिक जीवन जगता येईल.
'फ्रान्स 24'चा हवाला देत मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे की, एका महिलेला तेहरान कोर्टाने संपूर्ण महिना शवागारात मृतदेह स्वच्छ करण्याची शिक्षा सुनावली आहे कारण तिने हिजाब घातला नव्हता. या महिलेला गाडी चालवताना पकडले गेले होते. या प्रकरणानंतर प्रसिद्ध इराणी अभिनेत्री अफसानेह बायगन हिला सुनावलेल्या दोन वर्षांच्या शिक्षेबाबतही वाद सुरू झाला आहे. याआधी अमिना नावाच्या महिलेच्या हत्येच्या निषेधार्थ अफसानेहने सोशल मीडियावर स्वत:चे अनेक फोटो पोस्ट केले होते, ज्यामध्ये तिने हिजाब घातला नव्हता. या प्रकरणात, अभिनेत्रीचे वय लक्षात घेता, तिला वेडे घोषित करण्यात आले आणि 2 वर्षांच्या तुरुंगवासाच्या ऐवजी आठवड्यातून एकदा मानसिक डॉक्टरांना भेटण्यास सांगितले.
काही काळापूर्वी इराणमधील न्यायालयाने अभिनेत्री आझादेह समदी हिच्यावरही 'सामाजिक व्यक्तिमत्व विरोधी विकार' म्हणून उपचार केले होते. हिजाबला विरोध करत, ती टोपी घातलेल्या व्यक्तीला अंतिम श्रद्धांजली वाहण्यासाठी स्मशानात गेली होती. त्यानंतर तिला 'सायकॉलॉजिकल सेंटर'मध्ये जाऊन थेरपी घेण्याचे आदेश देण्यात आले, जेणेकरून ती स्वत:मध्ये सामाजिकदृष्ट्या 'सुधार' करू शकेल.
याआधी व्यवस्थित हिजाब न परिधान केल्याने पोलिसांकडून अमिना या 22 वर्षीय तरुणीची हत्या करण्यात आली होती, ज्याला इराणसह जगातील अनेक महिलांनी तीव्र निषेध केला. महिलांनी निदर्शने केली, अनेक महिला खेळाडूंनी हिजाबशिवाय क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेतला. मात्र इराणच्या राजवटीने हे सर्व निषेध क्रूरपणे दडपले. (हेही वाचा: Telegram App Blocks in Iraq: इराकच्या Telegram वापरकर्त्यांना मोठा झटका, सरकारने केले ॲप ब्लॉक)
प्रशासनाने हिजाबबाबत आणखी कडक नियम लागू जेले. हिजाबशिवाय गाडी चालवताना दिसल्यास तक्रार करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. हिजाबशिवाय काम करताना दिसणार्या महिलेला तत्काळ हटवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. हिजाब न घालणाऱ्या महिलांवर रुग्णालयात उपचार करू नयेत, असा आदेशही जारी करण्यात आला आहे.