Israel-Hamas War: इस्रायलवर हमास (Hamas)च्या दहशतवादी हल्ल्यानंतर, पॅलेस्टाईनमधील रामल्ला येथील भारताच्या प्रतिनिधी कार्यालयाने सर्व भारतीय नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत किंवा कोणत्याही मदतीची आवश्यकता असल्यास कार्यालयाशी थेट संपर्क साधण्याचं आवाहन केलं आहे. प्रतिनिधी कार्यालयाने यासाठी 24 तास आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांकही जारी केला आहे. पॅलेस्टाईनमधील भारताच्या प्रतिनिधीच्या कार्यालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सांगितलं आहे की, कार्यालयाशी संपर्क साधता येईल: जवाल: 0592-916418, व्हॉट्सअॅप: +970 -59291641.
दरम्यान, शनिवारी हमास या दहशतवादी संघटनेने अचानक इस्रायलवर रॉकेटने हल्ला केला. सुमारे अर्धा तास दक्षिण आणि मध्य इस्रायलवर रॉकेटचा भडीमार करण्यात आला. आत्तापर्यंत 250 लोक ठार झाले आहेत आणि सुमारे 1,104 जखमी झाले आहेत, असं स्थानिक वृत्तसंस्था टाईम्स ऑफ इस्रायलने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने म्हटले आहे. गाझामध्ये हमासच्या दहशतवाद्यांनी अनेक इस्रायलींना ओलीस ठेवले आहे. (हेही वाचा - Israel-Palestine War Escalates: इस्त्रायलकडून हमासला प्रत्युत्तर, 230 पॅलेस्टिनी ठार; PM Netanyahu यांचा गंभीर इशारा, Gaza Strip खाली करण्याचे आदेश)
इस्रायलची शहरे हमासच्या ताब्यात -
तथापी, सकाळी 6:30 च्या सुमारास (स्थानिक वेळेनुसार), गाझा येथून इस्रायलच्या दिशेने रॉकेट हल्ले सुरू झाले. देशातील तेल अवीव, रेहोवोट, गेडेरा आणि अश्केलॉनसह अनेक शहरांवर हल्ला करण्यात आला. यानंतर हमासचे अनेक दहशतवादी गाझा पट्टीतून इस्रायलमध्ये घुसले आणि त्यांनी इस्रायलची शहरे ताब्यात घेतली.
सीएनएनच्या वृत्तानुसार, हमासचे लष्करी कमांडर मुहम्मद अल-दीफ यांनी या मोहिमेला 'अल-अक्सा स्टॉर्म' म्हटले आहे. इस्त्रायलवरील हा हल्ला महिलांवरील हल्ले, जेरुसलेम आणि गाझामधील अल-अक्सा मशिदीची विटंबना यांच्याशी सुसंगत असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, इस्रायलमधील भारतीय दूतावासाने शनिवारी आपल्या नागरिकांना सतर्क राहण्याची आणि सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करण्याची विनंती केली आहे. इस्रायलमधील सद्यस्थिती लक्षात घेता, इस्रायलमधील सर्व भारतीय नागरिकांना सतर्क राहण्याची आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करण्याची विनंती करण्यात आली आहे.
कृपया सावधगिरी बाळगा, अनावश्यक हालचाली टाळा, असं एका सल्लागारात म्हटलं आहे. सुरक्षा आश्रयस्थानांच्या जवळ रहा. अतिरिक्त माहितीसाठी, कृपया इस्रायली होम फ्रंट कमांड वेबसाइटला भेट द्या (https://www.oref.org.il/en किंवा आपत्कालीन परिस्थितीत, कृपया आमच्याशी +97235226748 वर संपर्क साधा किंवा cons1.telaviv@ mea.gov वर एक संदेश द्या. पुढील मार्गदर्शनासाठी दूतावासातील कर्मचारी तुमच्यासाठी उपलब्ध असतील, असंही या निवेदनात म्हटलं आहे.