
Advisory for Indians: सध्या इराण (Iran) आणि इस्रायल (Israel) मध्ये तणावाचे वातावरण असून दोन्ही देश एकमेकांवर क्षेपणास्त्र डागत आहेत. अशातचं आता भारतीय दूतावासाने इराण आणि इस्रायलमध्ये राहणाऱ्या भारतीयांसाठी एक सल्लागार (Advisory) जारी केला आहे. आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी दूतावासाशी संपर्क साधता यावा म्हणून 2 हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत.
भारतीयांना दूतावासाच्या संपर्कात राहण्याचा सल्ला -
दरम्यान, या सल्लागारात म्हटले आहे की, दोन्ही देशांमध्ये राहणाऱ्या भारतीयांनी त्यांच्या घरातच राहावे. फक्त आपत्कालीन परिस्थितीतच प्रवास करा, अन्यथा प्रवास टाळा. कोणत्याही प्रकारच्या आगामी माहिती किंवा ऑर्डरसाठी भारतीय दूतावासाच्या सोशल मीडिया अकाउंटचे अनुसरण करा. आपत्कालीन परिस्थितीत, 91281-09115 आणि 91281-09109 या मोबाइल क्रमांकांवर संपर्क साधा. सल्लागारात, भारतीयांना दूतावासाच्या स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (हेही वाचा -Israel-Iran Conflict: इस्रायल-इराणमधील संघर्ष वाढला; तेहरानने 2 बॅरेजमधून तेल अवीववर सुमारे 150 बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली)
इराण आणि इस्रायलमध्ये युद्धजन्य परिस्थिती -
गेल्या काही दिवसांपासून इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरू आहे. गेल्या 2 दिवसांपासून दोन्ही देश एकमेकांवर हवाई हल्ले करत आहेत. इस्रायलने प्रथम इराणमध्ये हवाई हल्ले केले. 13 जून रोजी पहाटे 200 लढाऊ विमानांनी इराणमध्ये हवाई हल्ले केले. तेहरानमध्ये अनेक ठिकाणी ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले. त्यानंतर रात्री उशिरा इराणमधील अण्वस्त्र प्रतिष्ठानांवर हल्ला करण्यात आला. इस्रायलच्या हल्ल्यात 6 इराणी अण्वस्त्रशास्त्रज्ञ आणि 4 उच्च लष्करी कमांडरसह 20 अधिकाऱ्याचा मृत्यू झाला.
इस्रायलचे इराणविरुद्ध ऑपरेशन -
इस्रायलने इराणविरुद्ध ऑपरेशन रायझिंग लायन सुरू केले आहे. इस्रायलचे उद्दिष्ट इराणला अण्वस्त्रे बनवण्यापासून रोखणे आहे. इस्रायली लष्कराचे प्रवक्ते बीजी एफी ड्रॉफिन यांनी एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, इराणने अमेरिका आणि इतर देशांशी केलेल्या कराराचे उल्लंघन केले आहे. निर्बंध असूनही, त्यांनी युरेनियमचा साठा केला आणि अण्वस्त्र कार्यक्रम सुरू ठेवला.