गेल्या काही दिवसांपासून फ्रान्समध्ये हिंसाचार सुरू आहे. 17 वर्षीय अल्पवयीन मुलावर पॅरिसमध्ये पोलिसांनी गोळीबार केला होता. त्यानंतर पोलिस आणि सरकारविरोधात फ्रान्समधील नागरिक आक्रमक झाले आहेत. पाचव्या दिवशीही मार्सेल या शहरात पोलिस आणि आंदोलकांमध्ये संघर्ष झाला. पॅरिसच्या उपनगरात वाहतूक नियमाचे उल्लंघन केल्याबद्दल पोलिसांनी 17 वर्षीय नाहेल एम. नावाच्या मुलावर गोळीबार केला होता. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात मुलाचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर सरकार आणि पोलिसांच्या विरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप उफाळला. याबाबत बोलताना पोलिसानी सांगितले की, या मुलाने गाडी पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे पोलिसांनी गोळीबार केला होता. (हेही वाचा - NCP State President: राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचाली; खासदार, आमदार अजित पवारांच्या बंगल्यावर दाखल)
या घटनेच्या निषेधार्थ नागरिक पॅरिस उपनगरात आणि फ्रान्समधील रस्त्यांवर उतरले आहेत. अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. आंदोलकांकडून गाड्यांची जाळपोळ, इमारती व दुकानांची लुटमार सुरू आहे. पोलिसांनी आंदोलकांना रोखण्यासाठी अश्रुधुराचा वापर केला आहे. शनिवारी फ्रान्समध्ये सुमारे 45 हजार पोलिस तैनात करण्यात आले आहेत. गुरुवारी 900 आंदोलकांना पोलिसांनी अटक केली होती. शुक्रवारी 1300 हून अधिक आंदोलकांना पोलिसांनी अटक केली आहे.
पॅरिसमध्ये लुई व्हिटॉनसारख्या ब्रँडची दुकाने आंदोलकांकडून लुटण्यात येत आहेत. ‘झारा’, ‘ॲपल’ व ‘नायकी’ सारख्या ब्रँडच्या दुकानांमध्येही आंदोलकांनी लुटमार केली आहे.