Ajit Pawar | (Photo Credit: Archived, edited, representative images)

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या बैठकीत अजित पवारांनी (Ajit Pawar) अप्रत्यक्षरित्या प्रदेशाध्यक्ष होण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यानंतर राज्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष बदलाची चर्चा सुरु झाली. आता प्रदेशाध्यक्ष पदाबाबत निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादीमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.  राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे देवगिरी बंगल्यावर दाखल झाले आहेत. अजित पवारांच्या उपस्थितीत  बैठक होणार आहे.  (हेही वाचा - Mumbai Accident: मुंबईत बेस्ट बस आणि रिक्षाच्या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू)

अजित पवार यांनी आपल्याला विरोधीपक्षनेते पद नको आता संघटनात्मक जबाबदारी हवी असं म्हणत नवे प्रदेशाध्यक्ष होण्याची इच्छा अप्रत्यक्षरित्या बोलून दाखवली आणि त्यानंतर चर्चा सुरु झाल्या.  राष्ट्रवादीचे आमदार, जिल्हाध्यक्ष देवगिरीवर दाखल झाले आहे. राष्ट्रवादीचे वरीष्ठ नेते दिलीप वळसे पाटील आणि हसन मुश्रीफ देखील अजित दादांच्या देवगिरी बंगल्यावर दाखल  झाले आहेत. खासदार अमोल कोल्हे देखील अजितदादांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.

एकीकडे अजित पवारांनी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी अप्रत्यक्षरित्या मागितली असताना दुसरीकडे ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी विरोधीपक्षनेते पद मराठा समाजाकडे असेल तर प्रदेशाध्यक्ष ओबीसी समाज किंवा इतर समाजातील नेत्याला करा अशी मागणी केली आहे. त्यामुळे आता जर विरोधीपक्षनेते पदी असलेले अजित पवार प्रदेशाध्यक्ष झाले तर विरोधीपक्षनेते पदी ओबीसी नेत्याला संधी देण्याची मागणी समोर येण्याची शक्यता आहे.  सध्या पक्षांतर्गत निवडणुका सुरु असून प्रदेशाध्यक्षपदाचा निर्णय त्यानंतरच होणार असल्याची शक्यता आहे.