Accident (PC - File Photo)

मुंबईत (Mumbai) आज पहाटे एक भीषण अपघात घडला आहे. बेस्ट बसचा (BEST Bus) अपघात (Accident) झाला. बेस्टच्या दोन बस आणि एका ऑटोरिक्षा यांच्यात भीषण धडकेत दोन जणांना आपला जीव गमवावा लागला. वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेच्या गोरेगाव चेक नाका पुलावर ही घटना घडली. जॉनी संखाराम (वय 42 वर्षे) आणि सुजाता पंचकी (वय 38 वर्षे) अशी मृतांची नावं आहेत. (हेही वाचा - Mumbai News: अमेरिकेतील प्रसिद्ध डॉक्टरच्या‌ मुलाचा 22 व्या मजल्यावरून पडून मृत्यू, अंधेरीतील घटना)

या अपघातात बेस्ट बस क्रमांक 1453 (एमएच 01 एपी 0226) आणि बेस्ट बस क्रमांक 1862 (एमएच 01 एपी 0746) या दोन्ही बस आगार पोईसर डेपोहून घाटकोपर डेपोकडे जात होत्या. संतोष विष्णू देवूलकर (53) हे बस क्रमांक 1453 चालवत होते, तर बस क्रमांक 1862 संतोष शंकर घोंगे (45) हे चालवत होते. पहाटे पावणे दोनच्या सुमारास, बस क्रमांक 1862 च्या चालकाने ब्रेक लावला आणि बस क्रमांक 1453 च्या चालकालाही असं करण्यास सांगितलं. मात्र मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्ते निसरडे झाले असल्याने, बस क्रमांक 1453 घसरली आणि आधी बस क्रमांक 1862 आणि नंतर ऑटोरिक्षाला (एमएच 02 ईक्यू 9371) धडकली.

या अपघातात ऑटोरिक्षातील जॉनी संखाराम आणि सुजाता पंचकी हे प्रवासी गंभीर जखमी झाले. पोलिसांनी त्यांना तातडीने ट्रॉमा केअर रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र जॉनी संखाराम यांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच पहाटे पावणे तीन वाजता मृत घोषित करण्यात आलं. सुजाता पंचकी यांना अंधेरीतील कोकिलाबेन रुग्णालयात हलवण्यात आलं, जिथे पहाटे पावणे चार वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.