Germany Floods. (Photo Credits: Twitter@136thbigcountry)

विक्रमी पावसामुळे युरोपमधील (Europe) अनेक नद्यांचे काठ तुटले आहेत. या पावसामुळे इतका मोठा पूर (Flood) आला आहे की, नद्यांचे पाणी शहरांमध्ये वेगाने पसरत आहे. पूरामुळे युरोपमधील काही भाग पाण्याखाली गेले आहेत व यामुळे युरोपला 70 हजार कोटींचे नुकसान होण्याचा अंदाज आहे. आतापर्यंत पुरामुळे सुमारे 200 लोकांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज आहे. अजूनही शेकडो लोक बेपत्ता आहेत. बेल्जियममध्ये पुरात 27 लोकांचा मृत्यू झाल्याने तिथे राष्ट्रीय शोक दिन जाहीर केला होता. पुराचे पाणी थोडे झाल्यावर बचावकर्ते ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध घेत आहेत.

युरोपमधील हा पूर 100 वर्षातील सर्वात मोठा पूर समजला जात आहे. पूरग्रस्त भागात प्रशासनाकडून सातत्याने मदतकार्य सुरू आहे. त्याबरोबरच पश्चिम जर्मनी, पूर्व बेल्जियम आणि नेदरलँड्समध्ये पूरानंतर तयार झालेल्या दलदलींची स्थिती साफ करण्यासाठीचे प्रयत्न अधिक तीव्र केले गेले आहेत. या पुरामध्ये सर्वात जास्त बाधित जर्मन प्रदेश राईनलँड-पॅलेटिनेटमध्ये 117 लोकांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे, तर शेजारच्या उत्तर राईन-वेस्टफालियामध्ये 47 लोक मरण पावले आहेत. पुराचा सर्वाधिक फटका जर्मनीला बसला आहे.

आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या वृत्तानुसार, पश्चिम जर्मनीच्या रेव्हेलर प्रशासनाने म्हटले आहे की मोबाइल नेटवर्क बंद पडल्यामुळे 1300 लोक बेपत्ता असल्याचा अंदाज आहे. या पुरामुळे ग्रामीण भागात बरेच नुकसान झाले. रेल्वे आणि रस्त्यांचा संपर्क तुटला आहे. अर्थमंत्री ओलाफ स्कोल्ज यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुरामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी 300 दशलक्ष युरोची आवश्यक भासेल. (हेही वाचा: Norovirus in UK: कोविड-19 नंतर आता ब्रिटनमध्ये नोरोव्हायरसचा धोका; जाणून घ्या किती घातक आहे हा विषाणू)

मंत्री रविर लेव्हेंट्झ यांनी रविवारी चांसलर अँजेला मर्केल यांच्या सोबत शुल्डे गावाला भेट दिल्यानंतर सांगितले की पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वैज्ञानिकांच्या मते हवामान बदलामुळे या वेळी जगातील काही भागात मुसळधार पाऊस पडत आहे. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, जागतिक तापमानात वाढ होत असताना पाण्याचे अधिक बाष्पीभवन होते ज्यामुळे पावसाचे प्रमाण आणि बर्फवृष्टीचे प्रमाण वाढते.