रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी त्यांच्या वैयक्तिक कर्मचार्यांमधील सुमारे 1000 सदस्यांची बदली केली आहे. हे लोक त्यांना विष देतील अशी भीती पुतिन यांना वाटत असल्याने असे करण्यात आले आहे. डेली बीस्टच्या वृत्तात रशियन सरकारी सूत्राचा हवाला देत असे म्हटले आहे की, सध्याचे अंगरक्षक, स्वयंपाकी, कपडे धुण्याचे काम करणारे आणि सेक्रेटरी यांना काढून टाकण्यात आले आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा जगभरातील देशांनी मोठ्या प्रमाणावर निषेध केला आहे. याशिवाय, पुतिन आणि रशियावर जगभरात कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर पुतीन यांना भीती वाटत आहे की कोणीतरी त्यांना मारून टाकण्याचे प्रयत्न करेल.
अमेरिका आणि पश्चिमेकडील देशांमधील अधिकाऱ्यांनी फेब्रुवारीमध्ये वारंवार चेतावणी दिली होती की रशिया युक्रेनच्या सामायिक सीमेवर सैन्य गोळा करत आहे. युक्रेनवर हल्ला करण्याचा त्याचा हेतू आहे. मात्र, क्रेमलिनने हल्ले होण्याची शक्यता नाकारली. परंतु 24 फेब्रुवारीला पुतीन यांच्या आदेशावरून युक्रेनवर हल्ला करण्यात आला. त्याचवेळी, अमेरिकेचे दक्षिण कॅरोलिनाचे खासदार लिंडसे ग्रॅहम यांनी रशियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या हत्येबद्दल भाष्य केले होते.
या महिन्याच्या सुरुवातीला ग्रॅहम यांनी पुतीन यांची तुलना अॅडॉल्फ हिटलरशी केली होती. ते म्हणाले होते की, युद्ध संपवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे कोणीतरी पुतीन यांना संपवावे. लिंडसे ग्रॅहम यांनी डेली बीस्टला सांगितले की, ही गोष्ट कोणत्याही परदेशी सरकारकडून केली जाणार नाही, तर क्रेमलिनमधूनच हा प्रयत्न केला जाईल. रशियन गुप्तचर विभाग ही जगात कदाचित अशी एकमेव संस्था उरली असेल, जी लोकांना मारण्यासाठी विष देते. विषबाधाच्या घटना यापूर्वी क्रेमलिन (रशियन अध्यक्षीय कार्यालय) शी जोडल्या गेल्या आहेत. (हेही वाचा: आता पुतीन चेहऱ्यासाठी वापरू शकणार नाहीत 'बोटॉक्स'; सौंदर्यविषयक उत्पादनांचे रशियामधील ऑपरेशन्स निलंबित)
याआधी क्रेमलिनच्या विरोधात बोलणाऱ्या लोकांना विष देण्यात आले होते. पुतीन यांचे सर्वात मोठे समीक्षक अलेक्सी नवलनी यांना ऑगस्ट 2020 मध्ये नोविचिक देण्यात आले. मात्र उपचारामुळे ते वाचले व सध्या ते रशियातील तुरुंगात आहेत. रशियन टीव्हीवर बोलताना व्लादिमीर पुतिन म्हणाले होते की, युक्रेनसोबत युद्ध सुरू झाल्यानंतर रशियामध्ये त्यांच्याविरोधात विशेष ऑपरेशन सुरू केले जाऊ शकते. काही लोक देशद्रोही असल्याने त्यांच्याविरुद्ध खुनाचा कट रचू शकतात.