Donald Trump, Narendra Modi, Imran Khan (Photo Credits: PTI)

सध्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) अमेरिका दौऱ्यावर आहेत. काल त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांची भेट घेतली. त्यानंतर पार पडलेल्या पत्रकार परिषदेमध्ये भारत-पाकिस्तान वादाचा विषय असलेल्या काश्मीर मुद्द्यावर प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीर प्रश्न सोडविण्यासाठी माझ्याकडे मदत मागितली होती’, असे वक्त्यव्य ट्रम्प यांनी केले होते. वक्त्यव्यावर भारतामध्ये अनेक प्रतिक्रिया उमटल्या मात्र भारताने ट्रम्प हे पूर्णपणे खोटे बोलत असल्याचे सांगत हा दावा फेटाळून लावला आहे.

परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रविश कुमार (Raveesh Kumar) यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. यामध्ये ते म्हणतात, ‘डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेले वक्तव्य पूर्णपणे खोटे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांच्याकडे काश्मीर मुद्द्यावर कोणतीही मदत मागितली नव्हती.’ अशाप्रकारे भारताने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच इतर कोणीही मध्यस्ती करून नाही तर द्विपक्षीय चर्चेने या काश्मीर मुद्दा सोडवता येणार आहे. यासाठी पाकिस्तानला सीमेपलीकडील दहशतवादी हल्ल्यांना खात पाणी घालणे बंद करावे लागेल असेही रविश कुमार म्हणाले. (हेही वाचा: खुशखबर! आता अमेरिकेत कायमस्वरूपी राहणे झाले सोपे; ग्रीन कार्ड वरील मर्यादा शिथिल)

यापूर्वी काश्मीर मुद्द्यासाठी पाकिस्तानने अनेकवेळा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मदत मागितली होती. मात्र भारताने हा आम्हा दोन देशांतील मुद्दा आहे त्यात तिसऱ्याने मध्ये पडू नये असे सांगितले होते. दोन्ही देश या मुद्द्यावर चर्चेतून तोडगा काढण्यासाठी शिमला करार आणि लाहोर जाहीरनाम्याचा आधार घेतील हेही स्पष्ट करण्यात आले होते. आता स्वतःहून डोनाल्ड ट्रम्प यांनी खोट्या दाव्याद्वारे आपण मध्यस्ती करण्यास तयार असल्याचे सांगितले असता, इम्रान खान यांनी या गोष्टीचे स्वागतच केले आहे.