गाझा (Gaza) पट्टीतील हमास आणि इस्रायलमधील संघर्ष थांबला आहे. या संपूर्ण युद्धामध्ये अमेरिकेने इस्रायलला मोठा पाठींबा दर्शवला होता. आता बुधवारी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू (Benjamin Netanyahu) यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांची भेट घेतली. ट्रम्प यांनी नेतन्याहू यांचे व्हाईट हाऊसमध्ये स्वागत केले. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये हमाससोबत युद्धबंदीबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. यानंतर, ट्रम्प यांनी नेतन्याहू यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेत गाझा पट्टीबाबत धक्कादायक विधान केले. ट्रम्प म्हणाले की, अमेरिका गाझा पट्टी ताब्यात घेईल. गाझामधील उद्ध्वस्त इमारती समतल करेल आणि असा आर्थिक विकास करेल ज्यामुळे या प्रदेशातील लोकांना अमर्याद नोकऱ्या आणि घरे उपलब्ध होतील. येथे आमचे मालकी हक्क असतील. तसेच यावेळी त्यांनी गाझामधून पॅलेस्टिनी लोकांना विस्थापित करण्याच्या त्यांच्या प्रस्तावाचा पुनरुच्चार केला.
पॅलेस्टिनी लोकांचे पुनर्वसन-
गाझामध्ये पॅलेस्टिनी लोकांचे ‘भविष्य नाही’ आणि विस्थापित पॅलेस्टिनींना युद्धग्रस्त प्रदेशाबाहेर कायमचे पुनर्वसन करावे, असे ट्रम्प यांनी यापूर्वी सुचवले होते. या लोकांचे जॉर्डन आणि इजिप्तमध्ये पुनर्वसन करावे, असे ते म्हणाले होते. आता व्हाईट हाऊसमध्ये बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी चर्चा करताना अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी पॅलेस्टिनी भूभागाला ‘विनाश स्थळ’ म्हटले.
अमेरिका संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून बाहेर-
ते पुढे म्हणाले, गाझा प्रदेश ताब्यात घेऊन तिथे धोकादायक न फुटलेले बॉम्ब आणि इतर शस्त्रे वापरणे थांबवू. मला आशा आहे की ही युद्धबंदी एका मोठ्या आणि अधिक चिरस्थायी शांततेची सुरुवात असू शकते. माझे प्रशासन युतीमध्ये विश्वास पुनर्संचयित करण्यासाठी आणि संपूर्ण प्रदेशात अमेरिकन शक्ती पुन्हा निर्माण करण्यासाठी वेगाने काम करत आहे. दुसरीकडे, अमेरिका संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून बाहेर पडत आहे. ट्रंप म्हणाले, हमासला निधी देणारी संयुक्त राष्ट्रांची संस्था आणि मानवतेसाठी एक गंभीर धोका असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या मदत आणि बांधकाम संस्थेला आम्ही सर्व पाठिंबा बंद करत आहोत.
अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी सांगितले की, जर गाझा पुनर्बांधणीसाठी अमेरिकन सैन्याची आवश्यकता असेल तर ते गाझामध्ये सैन्य तैनात करण्याचा विचार करू शकतात. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनीही ट्रम्प यांच्या योजनेला पाठिंबा दिला आणि त्यावर आनंद व्यक्त केला. दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू हे ट्रम्प यांच्या शपथविधी समारंभानंतर व्हाईट हाऊसला भेट देणारे पहिले नेते होते. (हेही वाचा: Hamas-Israel Ceasefire: हमासकडून 4 इस्रायली महिला सैनिकांची सुटका; गाझा युद्धबंदी कराराचा भाग म्हणून इस्रायल 200 पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करणार)
गाझामध्ये इस्रायलची उद्दिष्टे –
नेतन्याहू म्हणाले, ‘तुम्ही (डोनाल्ड ट्रम्प) तुमच्या दुसऱ्या कार्यकाळात व्हाईट हाऊसला भेट देणारे पहिले परदेशी नेते होण्यासाठी मला आमंत्रित केले याचा मला सन्मान आहे. हे तुमच्या ज्यूंच्या मैत्रीचे आणि पाठिंब्याचे प्रतीक आहे. मी हे आधीही सांगितले आहे आणि पुन्हा एकदा सांगेन की, व्हाईट हाऊसमध्ये तुम्ही इस्रायलचे सर्वात चांगले मित्र आहात आणि म्हणूनच इस्रायलच्या लोकांना तुमच्याबद्दल प्रचंड आदर आहे.’ ते म्हणाले गाझामध्ये इस्रायलची तीन उद्दिष्टे आहेत: हमासच्या लष्करी आणि प्रशासन क्षमता नष्ट करणे, आपल्या सर्व ओलिसांची सुटका करणे आणि गाझा पुन्हा कधीही इस्रायलसाठी धोका निर्माण करणार नाही याची खात्री करणे.