Donald Trump To Visit India: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुढच्या महिन्यात भारत दौर्याची योजना आखत आहेत, अशी माहिती ब्लूमबर्गने मंगळवारी एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याचा हवाला देऊन दिली आहे. या भेटीसाठी अमेरिका आणि भारत योग्य तारीख निश्चित करण्यासाठी संपर्कात आहेत. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौर्याच्या तारखा निश्चित करण्यासाठी भारतीय आणि अमेरिकन अधिकारी चर्चा करत होते, अशी माहिती वृत्तसंस्था पीटीआयने सरकारी सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.
गेल्या वर्षी प्रमुख पाहुणे म्हणून ट्रम्प यांना प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी भारताकडून आमंत्रण देण्यात आलं होतं. पण वेळापत्रक निश्चित करण्याच्या मुद्द्यांमुळे अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प त्यावेळी येऊ शकले नव्हते.
“आता दोन्हीकडून तारखा निश्चित करण्यासाठी चर्चा सुरु आहेत,” अशी माहिती सूत्रांनी दिली. तारखा अंतिम करणे हे वॉशिंग्टनमधील राजकीय घडामोडींवरही अवलंबून असेल. कारण तिथे ट्रम्प यांच्याविरूद्ध महाभियोगाची कारवाई सध्या सुरू आहे, असंही सूत्रांनी सांगितले आहे.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अमेरिकेच्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांना आपल्या कुटुंबासमवेत भारत भेटीचे आमंत्रण दिले होते. तसेच परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी गेल्या महिन्यात वॉशिंग्टन दौऱ्यादरम्यान अमेरिकेला संदेश दिला होता की भारत अध्यक्ष ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याची वाट पाहत आहे. गेल्या आठवड्यात ट्रम्प आणि मोदी यांनी दूरध्वनीवर चर्चा केली. या दरम्यान त्यांनी अमेरिका-भारत स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप आणखी मजबूत करण्याच्या मार्गांवर चर्चा केली. अमेरिकेने बगदादमधील ड्रोन हल्ल्यात इराणचे सर्वोच्च कमांडर जनरल कासेम सोलेमानी यांना ठार मारल्यानंतर गल्फ प्रदेशात वाढणार्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हे संभाषण समोर आले आहे. मागील वर्षात भारत आणि अमेरिका यांच्यातील स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप आणखी मजबूत करण्याच्या महत्त्वपूर्ण प्रगतीवर मोदींनी प्रकाश टाकला आणि परस्पर हितसंबंधातील सर्व क्षेत्रात सहकार्य वाढविण्यासाठी अध्यक्ष ट्रम्प यांच्याबरोबर काम करत राहण्याची इच्छा व्यक्त केली, असे पीएमओने सांगितले होते.