कॅलिफोर्निया जंगलाच्या आगीत 25 जणांचा मृत्यु; हजारो लोकांचे स्थलांतर
कॅलिफोर्निया भीषण आग (Photo Credit- File Photo )

अमेरिकेच्या कॅलिफोर्निया प्रांतात आतापर्यंतच्या इतिहासात सर्वात मोठ्या आगीचे रौद्र रूप पाहायला मिळाले. इथल्या जंगलाला शनिवारी (10 नोव्हेंबर) लागलेल्या भीषण आगीत आतापर्यंत तब्बल 25 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या झालेल्या मृत्यूसोबतच परिसरातील हजारो घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली असून, रेस्टॉरंटस् आणि वाहने जळून खाक झाली आहेत, यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. अजूनही ही आग विझवण्याचे प्रयत्न शर्थीने चालू आहेत.

कॅलिफोर्नियाच्या जंगलात लागलेली हे आग वाऱ्यासारखी पसरत गेली, त्यामुळे इथल्या हजारो लोकांचे आणि पाळीव प्राण्यांचे स्थलांतर करण्यात आले आहे.  आजूबाजूची कित्येक गावे रिकामी करण्यात आली आहेत. या घटनेमुळे सॅनफ्रँसिस्को शहरापासून 290 किलोमीटर दूर, 27,000 हजार लोकसंख्या असलेल्या पॅराडाइज शहरातील प्रत्येक नागरीकाला शहर सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

जवळपास 70 एकरचे जंगल आगीत भस्मसात झाले आहे. जोरदार वारे वाहत असल्याने ही आग पसरत आहे. मलीबू रिसॉर्टपर्यंत ही आग पसरली आहे. मलीबू येथे ब्रॅड पिट, हॅले बेरी, जेनिफर ऑनिस्टन, लिओनार्डो डिकॅप्रियो, जॅक निकलसन या प्रसिद्ध कलाकारांची  घरेही आहेत. त्यामुळे या भीषण आगीनंतर त्यांनाही तातडीने ही घरं खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.