Cryptocurrency | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) व्यवहारांबाबत चीन सरकारने कडक पावले टाकली आहेत. महत्त्वाचे म्हणजे चीनच्या पीपुल्स बँक ऑफ चायना (People's Bank of China) ने क्रिप्टोकरन्सी व्यवहारांना अवैध घोषीत केले आहे. याबाबतचे वृत्त प्रसारमाध्यमांतून झळकताच क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये (Cryptocurrency Market) मोठी खळबळ उडाली. मार्केट धाडकन कोसळले. बिटकॉईन (Bitcoin), डॉजकॉईन (Dogecoin) किमतीतही मोठ्या प्रमाणावर घसरण झाली आहे. चीनच्या सेंट्रल बँकेने म्हटले आहे की, वित्तीय संस्था, गुंतवणूक कंपन्या आणि इंटरनेट फर्म आदींमध्ये चालणाऱ्या क्रिप्टोकरन्सी व्यवहारांवर पूर्णपणे बंदी (China Bans Cryptocurrency) घातली जाईल. तसेच नागरिकांकडून केल्या जाणाऱ्या अशा प्रकारच्या व्यवहारांवरही सरकार बारीक लक्ष ठेवणार आहे. त्यासाठी एक योजना बनविण्यात येईल.

चीनच्या सेंट्रल बँकेकडून क्रिप्पटोकरन्सी बाबत घेतलेला हा पहिलाच आणि महत्त्वपूर्ण निर्णय आहे. या आधी चीनच्या स्टेट काऊन्सील म्हणजेच कॅबिनेटने मे महिन्यात वित्तीय जोखीम दूर करण्यासाठीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून क्रिप्टो मायनिंग आणि ट्रेडिंगवर बंदी घालण्याबाबत विचार केला होता. (हेही वाचा, Cryptocurrency Bitcoin: बिटकॉईन गुंतवणूक वादातून 32 वर्षीय तरुणाची हत्या, तीन आरोपींना अटक; वाशीम येथील घटना)

चीन सरकारच्या या निर्णयानंतर बिटक्वाईनची किंमत 4.6% घसरली. घसरण झाल्यानंतर बिटकॉईनची किंमत भारतीय रुपयांमध्ये 31 लाख रुपये इतकी आहे. जगातील दुसऱ्या सर्वात मोठ्या क्रिप्टोकरन्सी च्या किमतीत सुमारे 8% घसरण झाली आहे. भारतातील गुंतवणुकदारांचा क्रिप्टोकरन्सीबाबतचा कल वाढला आहे. दरम्यान, केंद्रीय रिझर्व्ह बँक या करन्सीबाबत भलतीच चिंतीत आहे. काहीशी संशयाने पाहात आहे. (हेही वाचा, Bitcoin In El Salvador: अधिकृत मान्यता मिळाल्यावर एल साल्वाडोर देशात बिटकॉईन करन्सीची कशी आहे स्थिती? घ्या जाणून)

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी नुकतेच म्हटले होते की, क्रिप्टोकरन्सी बाबत आम्ही चिंतेत आहोत. आम्ही भारत सरकारला या चिंतेबाबत माहिती दिली आहे. त्यावर सरकारने निर्णय घ्यायचा आहे. क्रिप्टोकरन्सी ही एक डिजिटल चलन प्रणाली आहे. जी आपण पाहू शकत नाही. तसेच जिला आपण स्पर्शही करु शकत नाही. स्पष्टच भाषेत सांगायचे तर ही एक ब्लॉकचेन प्रणाली आहे. ब्लॉकचेनद्वारेच तिच्यावर नियंत्रण ठेवले जाते. या करन्सीवर देशाची केंद्रीय बँक आरबीआयसुद्धा नियंत्रण ठेवत नाही.