Covid-19 Vaccine: 5-11 वर्षांच्या मुलांसाठी Pfizer ची लस सुरक्षित; क्लिनिकल ट्रायलच्या रिझल्ट्समध्ये व्हायरसवर ठरली प्रभावी
Pfizer (Photo Credits: IANS)

कोरोना विषाणू (Coronavirus) लस कंपन्या फाइझर आणि बायोएनटेकने (Pfizer and BioNTech) सोमवारी सांगितले की, काही चाचण्यांमधून हे समोर आले आहे की, कोरोना व्हायरस लस (Covid-19 Vaccine) सुरक्षित आहे आणि ती 5 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांमध्ये चांगल्या प्रकारे प्रतिकारशक्ती निर्माण करते. अमेरिकन दिग्गज फायझर आणि त्याच्या जर्मन भागीदाराने संयुक्त निवेदनात म्हटले आहे, ‘पाच ते 11 वर्षे वयोगटातील लोकांसाठी ही लस सुरक्षित ठरली होती. या सहभागींमध्ये लस सहन करण्याची सहनशक्ती होती व त्यांच्या शरीरामध्ये अँटीबॉडीज आढळल्या.

जगातील अनेक देशांमध्ये 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना आणि प्रौढांना फायझर व मॉडर्नाचे डोस आधीपासून दिले जात आहेत. लहान मुलांच्या शरीरात कोणताही आजार नसल्यामुळे व त्यांची रोगप्रतिकार शक्ती चांगली असल्याने, त्यांना कोरोना व्हायरसचा धोका कमी असल्याचे मानले जात आहे. परंतु अशी चिंता आहे की अत्यंत संक्रामक डेल्टा प्रकारामुळे अधिक गंभीर प्रकरणे समोर येऊ शकतात. फायझरचे मुख्य कार्यकारी अधिकारी अल्बर्ट बोर्ला यांनी सांगितले की, ‘अमेरिकेत बालरोग प्रकरणांमध्ये सुमारे 240 टक्क्यांनी वाढ झाली आहे, म्हणूनच आम्ही मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात या लसीपासून मिळणारी सुरक्षा देऊ इच्छित आहोत.’ (हेही वाचा: अजूनही Covid-19 Vaccine घेतली नसेल तर ताबडतोब घ्या; लस न घेतलेल्या लोकांमध्ये मृत्यूचा धोका 11 पट अधिक- New Study)

फायझर आणि बायोएनटेकचे म्हणणे आहे की, लसीच्या फेज II-III क्लिनिकल ट्रायल्समध्ये, 5-11 वर्षांच्या मुलांमध्ये रोगप्रतिकारक प्रतिक्रिया दिसून आली, जी आधी 16 ते 25 वर्षे वयोगटातील लोकांच्या प्रतिसादांशी जुळते. कंपनीने म्हटले आहे की लहान मुलांना मास्क आणि सामाजिक अंतरांबद्दल समजावून सांगणे कधीकधी कठीण होते, अशा परिस्थितीत लसीची गरज वाढते. दरम्यान, अमेरिकेसह अनेक देशांमध्ये 12 वर्षापर्यंतच्या 2268 मुलांना देण्यासाठी कंपनीची लस मंजूर झाली आहे. यापूर्वी ती 16 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना वापरण्याची परवानगी होती.