COVID-19 Vaccination Fraud: काय सांगता? पट्ठ्याने तब्बल 8 वेळा घेतली कोरोना विषाणू विरोधी लस; 9 व्यांदा घेण्यास गेला असता झाली अटक 
Covid-19 Vaccine | Representational Image | (Photo Credits: Pixabay.com)nation)

जगात असे अनेक लोक आहेत जे कोरोना विषाणूची लस (Coronavirus Vaccine) घेण्यापासून दूर पळत आहेत. सरकारने जनजागृती करून, सुचना देऊन, सक्ती करूनही असे अनेक लोक आहेत ज्यांनी अजून कोरोना विषाणूची लस घेतली नाही. परंतु पश्चिम युरोपातील बेल्जियम (Belgium) या देशामध्ये एका तरुणाने लस घेण्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. त्याने एकदा नव्हे, दोनदा नव्हे तर तब्बल 8 वेळा कोरोनाची लस घेतली आहे. एवढेच नाही तर तो 9 व्यांदा लस घेण्यासाठीही पोहोचला होता, ज्यावेळी त्याला पकडले गेले. आता फसवणुकीच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे इतक्या लसी घेऊनही त्याच्या शरीरावर कोणतेही दुष्परिणाम दिसले नाहीत.

हे धक्कादायक प्रकरण वलून प्रांताचे आहे. येथील शॉर्लरॉय शहराची लोकसंख्या सुमारे दोन लाख आहे. अटक करण्यात आलेला तरुण लस न घेता प्रमाणपत्र मिळवू इच्छिणाऱ्या लोकांशी संपर्क साधायचा. म्हणजेच तो असे लोक गाठायचा ज्यांना लसीची भीती आहे अथवा लसीबद्दल संशय. बेल्जियम मीडिया लवेनिरच्या रिपोर्टनुसार, हा तरुण अशा लोकांकडून भली मोठी रक्कम घेत असे व त्यांच्याऐवजी स्वतः लस घेण्यासाठी जात असे. मात्र तो 9 व्यांदा लस घेण्यासाठी गेला असता आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्याला ओळखले. पोलिसांनी आरोपीची ओळख उघड केलेली नाही.

कोरोनाच्या नवीन प्रकाराच्या उद्रेकामुळे बेल्जियमने नवीन निर्बंध जाहीर केले आहेत. सर्व इनडोअर मार्केट, चित्रपटगृहे आणि इतर गर्दीची ठिकाणे बंद राहणार आहेत. क्रीडा स्पर्धा होत राहतील पण प्रेक्षकांशिवाय. 26 डिसेंबरपासून नवीन मार्गदर्शक तत्त्वे लागू होणार आहेत. (हेही वाचा: शाळा बंद, विमान उड्डाणे रद्द, कोट्यावधी लोक पुन्हा घरात कैद; चीनने Xi'an मध्ये लागू केले कडक लॉकडाऊन)

दरम्यान, जून 2021 मध्ये कांदिवलीच्या हिरानंदानी सोसायटीमध्ये लसीकरण शिबिराच्या बहाण्याने तीन जणांनी बनावट लसी देऊन सुमारे 5 लाख रुपयांची फसवणूक केली होती. यामध्ये 390 लोक फसवणुकीचे बळी ठरले होते. जेव्हा लस घेतल्यानंतर ताप किंवा डोकेदुखी अशी कोणतीही लक्षणे दिसून आली नाहीत, तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली होती.