Lockdown in China: शाळा बंद, विमान उड्डाणे रद्द, कोट्यावधी लोक पुन्हा घरात कैद; चीनने Xi'an मध्ये लागू केले कडक लॉकडाऊन  
Coronavirus Outbreak | Representational Image (Photo Credits: Getty Images)

जगभरात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढत आहे. चीनमध्येही (China) सध्या भीतीचे वातावरण आहे. आता कोरोनामुळे बिघडत चाललेली परिस्थिती पाहता चीनी सरकारने शिआन (Xi'an) प्रांतातील 13 दशलक्ष लोकांना पुढील आदेश येईपर्यंत घरी राहण्यास सांगण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चीनच्या शिआन प्रांतात कडक लॉकडाऊन (Lockdown) लागू करण्यात आला आहे. याठिकाणी साधारण 1.3 कोटी लोक राहतात व आता पुढील आदेशापर्यंत त्यांना घरात राहण्यास सांगण्यात आले आहे.

जारी केलेल्या आदेशानुसार, घरातील केवळ एका सदस्याला जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी दर दोन दिवसांनी घराबाहेर पडण्याची परवानगी असेल. इतर सर्व लोकांना घरातच राहावे लागेल. बुधवारी शिआनमध्ये कोरोनाची 52 नवीन प्रकरणे समोर आली आहेत, त्यानंतर 9 डिसेंबरपासूनचा एकूण आकडा 143 वर गेला आहे. यानंतर सरकारने या ठिकाणी लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला. अत्यंत गरजेचे असल्याशिवाय लोकांनी शहर सोडू नये, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे.

एखाद्याला बाहेर जायचे असल्यास त्याला ‘विशेष परिस्थितींचा’ पुरावा द्यावा लागेल आणि मंजुरीसाठी अर्ज करावा लागेल. शहरातील लांब पल्ल्यांची बस स्थानके बंद करण्यात आली आहेत. अधिकाऱ्यांनी शिआन प्रांताबाहेरील महामार्गांवर संक्रमण नियंत्रण चौक्या उभारल्या आहेत. शहरातील मुख्य विमानतळावरील 85 टक्क्यांहून अधिक उड्डाणे बंद करण्यात आली आहेत. त्याच वेळी, शहरातील बस आणि ट्रेनमध्ये प्रवासी क्षमता कमी करण्यात आली आहे. तसेच शाळा बंद करण्यात आल्या आहेत. (हेही वाचा: Omicron: ख्रिसमसपूर्वी युरोपियन देशात ओमिक्रॉनचा हाहाकार, नेदरलँडमध्ये लॉकडाउनची घोषणा)

वूहानमध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर चीनी सरकारने लागू केलेला हा सर्वात मोठा लॉकडाऊन असल्याचे सांगण्यात येत आहे. चीनची राजधानी बीजिंग फेब्रुवारी 2022 मध्ये हिवाळी ऑलिम्पिकचे आयोजन करण्याच्या तयारीत आहे. अशात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे पाहता देश हाय अलर्टवर आहे. दुसरीकडे, ओमायक्रॉन या कोरोनाच्या नवीन प्रकाराबाबत जगभरातील अनेक देशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. असे सांगितले जात आहे की ओमायक्रॉन प्रकार कोरोनाच्या डेल्टा प्रकारापेक्षा तिप्पट जास्त संसर्गजन्य आहे. भारतातही या नवीन प्रकाराची प्रकरणे वेगाने वाढत आहेत.