Covid-19 Leaked From Wuhan Lab: कोविड-19 विषाणू मानवनिर्मित, चीनमधील वुहान लॅबमधून झाला लीक; अमेरिकन शास्त्रज्ञाचा खळबळजनक दावा
Representational Image | (Photo Credits: Pixabay)

कोरोना महामारीचा (Covid-19) प्रसार करणाऱ्या कोविड-19 विषाणू हा मानवनिर्मित असल्याचा आरोप अनेक महिन्यांपासून होत आहे. आता ही शंका खरी ठरताना दिसत आहे. नुकतेच चीनच्या वुहान प्रयोगशाळेत (China's Wuhan Lab) काम करणाऱ्या एका शास्त्रज्ञाने कोविड-19 विषाणू मानवनिर्मित असल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. चीनमधील वुहान येथील वादग्रस्त लॅबमधील एका अमेरिकन शास्त्रज्ञाने दावा केला आहे की, कोविड-19 हा मानवनिर्मित विषाणू होता आणि तो या प्रयोगशाळेतून बाहेर पडला होता.

'न्यूयॉर्क पोस्ट'ने ब्रिटीश वृत्तपत्र 'द सन' मध्ये यूएस स्थित संशोधक अँड्र्यू हफ (Dr Andrew Huff) यांच्या विधानाचा हवाला देत म्हटले आहे की, कोविड दोन वर्षांपूर्वी वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (WIV) मधून लीक झाला होता. ही लॅब चिनी सरकारद्वारे चालवली जाते आणि सरकारकडून या प्रयोगशाळेला निधी दिला जातो. एपिडेमियोलॉजिस्ट अँड्र्यू हफ यांनी त्यांचे नवीन पुस्तक 'द ट्रूथ अबाउट वुहान' (The Truth About Wuhan) मध्ये हा दावा केला आहे.

हफ यांचा दावा आहे की, चीनमधील कोरोनाव्हायरस संशोधनासाठी अमेरिकन सरकारच्या निधीमुळे ही महामारी उद्भवली आहे. हफ यांच्या पुस्तकातील काही उतारे 'द सन' या ब्रिटीश वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले आहेत. अँड्र्यू हफ हे EcoHealth Alliance या न्यूयॉर्कस्थित ना-नफा संस्थेचे माजी उपाध्यक्ष आहेत. ही NGO संसर्गजन्य रोगांचा अभ्यास करते. संशोधक अँड्र्यू हफ यांनी ताज्या पुस्तकात दावा केला आहे की, लॅबमध्ये योग्य जैवसुरक्षा आणि जोखीम व्यवस्थापन व्यवस्था नव्हती. या कारणास्तव, वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या प्रयोगशाळेतून कोविड विषाणू लीक झाला. (हेही वाचा: क्रूरता ! एका व्यक्तीने विलगीकरणास नकार दिल्याने चीनच्या अधिकाऱ्यांनी जबरदस्तीने घरातून काढले बाहेर, पहा व्हिडिओ)

शास्त्रज्ञ हफ यांनी 2014 ते 2016 पर्यंत इकोहेल्थ अलायन्समध्ये काम केले. आता आपल्या पुस्तकामध्ये धोकादायक जैवतंत्रज्ञान चिनी प्रयोगशाळेत हस्तांतरित करण्यात अमेरिकन सरकार दोषी असल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान, कोविड विषाणू मानवनिर्मित आणि वुहानच्या प्रयोगशाळेतून पसरत असल्याचा दावा यापूर्वीही करण्यात आला होता. मात्र, चीन सरकारने या दाव्यांचे सातत्याने खंडन केले आहे. सरकारी अधिकारी आणि प्रयोगशाळेतील कर्मचारी या दोघांनीही या लॅबमध्ये विषाणूची उत्पत्ती झाल्याचे नाकारले आहे.