
एखाद्या व्यक्तीला कोरोना विषाणूचा (Coronavirus) संसर्ग झाला आहे की नाही, हे शोधण्यासाठी जगभरातील देशांमध्ये अनेक प्रकारच्या चाचण्या घेतल्या जात आहेत. अनेक देशांनी त्वरित रिझल्टसाठी स्वतःची प्रणाली विकसित केली आहे. मात्र फिनलँडने (Finland) यासाठी एक वेगळा मार्ग निवडला आहे. फिनलँडमध्ये आता कुत्रे कोरोना विषाणूची लागण झालेल्या रूग्णांची ओळख पटविणार आहेत. देशात येणाऱ्या प्रवाशांच्या नमुन्यांच्या वासावरून त्यांना कोविड-19 चे संक्रमण झाले आहे की नाही, हे शोधण्यासाठी तिथले सरकार विमानतळावर असे चार 'स्निफींग डॉग' (Sniffing Dogs) तैनात करणार आहे.
फिनलँडमध्ये स्निफर कुत्र्यांना असे खास प्रशिक्षण देण्यात आले आहे, ज्याद्वारे ते फक्त वासावरून कोरोना विषाणूची लागण झाली आहे का नाही ते सांगतील. यासाठीचा पायलट प्रकल्प फिनलँडच्या व्यस्त अशा हेलसिंकी विमानतळावर (Helsinki Airport) सुरू करण्यात आला आहे. या कुत्र्यांना फिनलंडमधील स्मेल डिटेक्शन असोसिएशनने प्रशिक्षण दिले आहे. कोरोना विषाणूची ओळख पटविण्यासाठी सध्या फिनलँडमध्ये 10 प्रशिक्षकांकडून 15 कुत्री प्रशिक्षण घेत आहेत. याआधी फिनलँडसोबतच अशा कुत्र्यांना युएईमध्येही प्रशिक्षण देण्यात आले आहे.
फिनलँडमध्ये कोसी नावाचा एक रेस्क्यू कुत्रा देखील आहे, ज्याने बऱ्याच मदत आणि बचाव कार्यात भाग घेतला आहे. या कुत्र्याला फिनलँडने 'स्निफर डॉग' म्हणून प्रशिक्षण दिले आहे, जेणेकरून फक्त वासावरून तो कोरोनाचे संक्रमण ओळखू शकेल. याआधी, कोसीला कर्करोग आणि मधुमेह सारखे रोग शोधण्याचे प्रशिक्षण दिले गेले होते आणि तो या कामात तज्ञ बनला आहे. आता चार स्निफर डॉग्ज विमानतळावर शिफ्टमध्ये काम करणार आहेत, एकावेळी दोन कुत्रे कामावर असतील व दोघे आराम करतील. या कामामध्ये कुत्र्यांना आराम महत्वाचा आहे. एकाचवेळी त्यांच्यासमोर बरेच वास आल्यास ते थकून जातात. (हेही वाचा: COVID 19 Vaccine Update: Johnson & Johnson कंंपनी कोरोना लसीच्या क्लिनिकल चाचणीच्या अंतिम टप्प्यात- डोनाल्ड ट्रंप)
साधारण 1 मिनिटांमध्ये हे कुत्रे कोरोना विषाणूचे संसर्ग ओळखू शकतील. एका तासामध्ये साधारण 250 लोकांचे नमुने हे कुत्रे तपासू शकतील, प्रयोगशाळेत यासाठी 5 तास लागतात.