महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांचे पणतू सतीश धुपेलिया (Satish Dhupelia) यांचे कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमण झाल्याने निधन झाले आहे. ते 66 वर्षांचे होते. ते दक्षिण अफ्रिकेतील जोहान्सबर्ग (Johannesburg) येथे राहात होते. तेथेच त्यांचा मृत्यू झाला. तीन दिवसांपूर्वी धुपेलिया यांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आली होती. कोरोना व्हायरस संसर्गामुळे शरीरात निर्माण झालेल्या गुंतागुंतीमुळे धुपेलिया यांचे निधन झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली.
सतीश धुपेलिया यांची बहिणी उमा धुपेलिया-मेस्थरी यांनी त्यांच्या निधनाच्या वृत्ताची पुष्टी केली आहे. उमा धुपेलिया यांनी सांगितले की, कोरोना व्हायरस संबंधित अडचणीमुळे त्यांची प्रकृती खालावत गेली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा भाऊ न्युमोनिया आजाराने ग्रस्त होता. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर सातत्याने उपचार सुरु होते. या काळातच ते कोरोना व्हायरस संसर्गाच्या विळख्यात आले. (हेही वाचा, Mahatma Gandhi Spectacles: महात्मा गांधी यांच्या चष्म्याचा लिलाव, किंमत ऐकुन व्हाल थक्क)
उमा धुपेलिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून त्यात म्हटले आहे की, ते एक महिन्यांपासून न्युमोनिया आजाराने ग्रस्त होते. त्यानंतर त्यांचे निधन झाले. रुग्णालयात उपचार सुरु असतानाच त्यांची कोरोन व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आली. दरम्यान सतीश धुपेलिया यांना उमा यांच्यासोबतच आणखी एक बहिण आहे. कीर्ति मेनन असे त्यांचे नाव आहे. कीर्ति या जोहान्सबर्ग येथे राहतात. सतीश, उमा आणि कीर्ति हे तिघेही मणिलाल गांधी यांचे वंशज आहेत. आपले कार्य पूर्ण करण्यासाठी महात्मा गांधी मनिलाल यांना दक्षिण अफ्रिकेत सोडून भारतात आले होते.
सतीश धुपेलिया यांनी आपले बहुतांश जीवन हे प्रसारमाध्यमांमध्ये घालवले त्यांनी एक व्हिडिओग्राफर आणि फोटोग्राफर म्हणून काम केले. डरबन येथे फीनिक्स सेटलमेंटमध्ये महात्मा गांधी यांच्याद्वारा सुरु करण्यात आलेल्या गांधी विकास ट्रस्टचे काम पुढे नेत ते सामाजिक कार्यात सक्रिय होते. ते सर्व समूदयातील गरजूंसाठी मदत करण्यासाठी प्रसिद्ध होते. अनेक सामाजिक उपक्रमांमध्येही त्यांनी आपले योगदान दिले होते.