चीन मधील वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला हादरवून सोडले आहे. जगभरात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या प्रचंड असून मृतांचा आकडा देखील वाढत आहे. जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीने दिलेल्या माहितीनुसार, जगभरात कोरोना व्हायरस बाधितांचा आकडा 40 लाखांवर पोहचत आहे. तर मृतांची संख्या 2 लाख 70 हजारांच्या वर गेली आहे. युनिव्हर्सिटीच्या सेंटर फॉर सिस्टम सायन्स अँड इंजिनियरींग यांच्या अपडेटनुसार, शनिवार (9 मे) रोजी मृतांचा आकडा हा 274,898 इतका होता.
जगभरात कोरोना व्हायरसला बळी पडलेल्यांची संख्या सर्वात जास्त अमेरिकेत आहे. अमेरिकेतील मृतांचा आकडा 77,180 इतका आहे. या क्रमवारीत युके दुसऱ्या स्थानावर आहे. युके मध्ये आतापर्यंत तब्बल 31,316 नागरिकांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. युरोप खंडातील सर्वाधिक मृत्यू युके मध्ये झाले आहेत.
अमेरिका आणि युके या शिवाय अजून 4 मोठ्या देशांमध्ये मृतांचा आकडा 10000 च्या पार गेला आहे. इटली (30,201), स्पेन (26,299), फ्रान्स (26,233) आणि ब्राझील (10,017) अशी मृतांची आकडेवारी आहे. 9 मे शनिवार सकाळच्या आकडेवारीनुसार, संपूर्ण जगात कोरोना बाधितांची संख्या 3,938,064 इतकी आहे.
कोरोना बाधितांच्या जागतिक क्रमावारीत अमेरिका 1,283,929 रुग्णांसह अव्वल स्थानी आहे. त्यानंतर स्पेन 1,283,929, इटली 217,185, युके 212,629, रशिया 187,859, फ्रान्स 176,202, जर्मनी 170,588, ब्राझील 146,894, तुर्की 135,569 आणि इराण 104,691 या देशांचा क्रमांक येतो. (भारतात 3320 नव्या रुग्णांसह कोरोना बाधितांची एकूण संख्या 59,662 वर, पाहा राज्यनिहाय आकडेवारी)
भारतात मागील 24 तासांत 3320 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली असून 95 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे भारतातील कोविड 19 पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 59662 इतकी झाली असून 17846 रुग्ण कोरोना संसर्गातून रिकव्हर झाले आहेत. तर 39834 रुग्णांवर अजूनही उपचार सुरु आहेत. देशातील कोरोना व्हायरसने घेतलेल्या बळींची संख्या 1981 इतकी आहे.