
चीनच्या (China) वूहान शहरामधून कोरोना विषाणूला (Coronavirus) सुरुवात झाली होती. हळू हळू या विषाणूने जगातील प्रत्येक देशामध्ये कधी शिरकाव केला हे समजलेच नाही. आता प्रत्येक देश या विषाणूशी सामना करीत आहे. यामध्ये न्युझीलंड (New Zealand) हा असा पहिला देश होता ज्याने पूर्णपणे कोरोनावर मात केली होती. संपूर्ण देश कोरोना व्हायरस मुक्त झाल्याची घोषणा केल्यानंतर, 102 दिवसांनी न्युझीलंडमध्ये कोरोना संक्रमित रुग्ण आढळले होते. त्यानंतर पुन्हा न्युझीलंडमध्ये निर्बंध घालण्यात आले होते. आता या देशाने मोठी कामगिरी करत दुसऱ्यांदा कोरोना विषाणूवर विजय मिळवला आहे.
ऑकलंड (Auckland) मधील सर्व निर्बंध बुधवारी रात्रीपासून काढून घेण्यात आले. कोरोनाच्या सतर्कतेची पातळी देखील 1 करण्यात आली आहे. हे निर्बंध हटवल्यानंतर देशातील बार आणि रेस्टॉरंट्समध्ये शंभरहून अधिक लोकांना एकत्र येण्यावरील बंदी उठविण्यात आली आहे. न्यूझीलंडच्या पंतप्रधान पंतप्रधान जॅसिंडा आर्डर्न (Jacinda Ardern) यांनी देशाने दुसर्या वेळी कोरोना विषाणूचा नाश केला असल्याचे सांगितले. यावेळी त्या म्हणाल्या, ‘आम्ही पुन्हा एकदा अभिमान बाळगू शकतो, आपण सर्वांनी एकत्र येऊन हे शक्य करून दाखवले.’
देशाच्या या विजयानंतर 18 ऑक्टोबर रोजी उत्सव साजरा केले जाणार आहे. देशाचे आरोग्यमंत्री म्हणाले. ‘ही बातमी देशाची मोठी कामगिरी आहे. लोकांच्या सामूहिक प्रयत्नाने न्यूझीलंडच्या लोकांनी पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा पराभव केला आहे. कोरोना विषाणूच्या पहिल्या लाटेनंतर देशाने जी सिस्टम बनवली होती त्याने व्हायरस विरूद्ध खूप चांगले कार्य केले. 24 सप्टेंबरपासून न्यूझीलंडमध्ये कोरोना विषाणू रुग्णांची कोणतीही नोंद झाली नाही.’
न्यूझीलंडने ज्या मॉडेलचे अनुसरण केले, तैवाननेही आपल्या देशामध्ये तेच अवलंबनात आणले. यासह हाँगकाँग आणि व्हिएतनामसह इतर ठिकाणीही कोरोनाच्या दुसर्या किंवा तिसर्या लाटेवर विजय मिळवला आहे. परंतु तज्ञांनी सांगितले की हा दृष्टीकोन सर्वत्र कार्य करेलच असे नाही.