Coronavirus: कोरोना व्हायरसमुळे जगभरात तब्बल 63,924 जणांचा मृत्यू; एकूण संक्रमितांची संख्या 1,182,827 वर
Coronavirus (Photo Credits: Pixabay)

चीन (China) मधील वूहान शहरातून प्रसवलेल्या कोरोना व्हायरस (Coronavirus) नामक आजाराने अवघ्या तीन महिन्यात संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. या आजारावर अजूनतरी काही लस नाही किंवा औषध नाही, त्यामुळे दिवसेंदिवस कोरोना बाधितांची वाढत असलेली संख्या चिंतेचा विषय बनत चालला आहे. आता या जागतिक महामारीमुळे, कोरोना विषाणूमुळे जगभरात 63,924 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. महत्वाचे म्हणजे या मृत्यूंपैकी जवळजवळ तीन चतुर्थांश मृत्यू फक्त युरोपमध्ये झाले आहेत. यासह कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या जगभरात 1,182,827 वर गेली आहे. एएफपीने अधिकृत सूत्रांच्या आधारे शनिवारी ही माहिती दिली.

आतापर्यंत जगभरात एकूण 63,924 मृत्यूची नोंद झाली असून, त्यापैकी, 44,132  मृत्यू युरोपमध्ये झाले आहेत. युरोपमधील अनेक देश या विषाणूमुळे खूप जास्त प्रमाणावर प्रभावित झाले आहेत. जगात 11,30,204 प्रकरणे अधिकृतपणे जाहीर करण्यात आली असून, त्यातील निम्म्याहून अधिक युरोपमध्ये (6,10,846) आहेत. अमेरिकेत 2,90,219 प्रकरणे नोंदवली गेली आहेत, तर आशियामध्ये 1,15,777 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. चीन, इटली आणि स्पेननंतर कोरोना व्हायरसचे नवीन केंद्र आता अमेरिका बनत चालले आहे. अमेरिकेत गेल्या 24 तासांमध्ये 1480 लोक मरण पावले आहेत. याबाबत अमेरिकेने एक प्रकारचे वर्ल्ड रेकॉर्ड केले आहे, एका दिवसात इतके मृत्यू दुसऱ्या कोणत्याच देशात झाले नाहीत. (हेही वाचा: Coronavirus: महाराष्ट्र, नवी दिल्ली सह जाणून घेऊया भारतातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण आकडेवारी)

अमेरिकेत कोरोना व्हायरसचे 2,78,458 रुग्ण आढळले आहेत, तर 7,159 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि 9,772 लोक बरे झाले आहेत. भारताबद्दल बोलायचे तर आज दिवसभरात हा आकडा 3113 वर जाऊन पोहोचला आहे. यात 2825 सक्रिय केसेस असून 212 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे, तर 75 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात आज कोरोना बाधित 145 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील एकूण रुग्ण संख्या 635 झाली. आतापर्यंत 52 करोना बाधित रुग्णांना बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तर 32 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.