Terrorist | Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

आफ्रिकन देश काँगोमधून (Congo) एक मोठी बातमी समोर आली आहे. येथील विस्थापितांच्या छावणीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे, ज्यामध्ये किमान 60 जणांचा मृत्यू झाला. हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी लोकांची हत्या केली आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने स्थानिक स्वयंसेवी संस्थेचे प्रमुख आणि एका साक्षीदाराच्या हवाल्याने या प्रकरणाची माहिती दिली आहे. ही घटना देशातील अशांत इटुरी (Ituri) प्रांतातील आहे, जो देशाच्या पूर्व भागात आहे. येथे मे 2021 पासून सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत.

मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे की, हा प्रांत खनिजांनी समृद्ध आहे आणि सशस्त्र गट येथे मुक्तपणे फिरतात. त्यांचा सामना करण्यासाठी प्रांतात अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. या भागातील हिंसाचारावर लक्ष ठेवणाऱ्या किवू सिक्युरिटी ट्रॅकरने ट्विटरवर म्हटले आहे की, ‘जुगु प्रदेशातील प्लेन सावो येथे काल रात्री धारदार शस्त्रांनी किमान 40 नागरिकांचा मृत्यू झाला.’ अद्याप कोणीही या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. पण केएसटीचे म्हणणे आहे की या हल्ल्यामागे कोडेको म्हणजेच स्थानिक बंडखोरांचा गट असल्याचे मानले जाते.

काँगोमध्ये हा प्रकार पहिल्यांदाच घडत नाही, तर याआधीही ख्रिसमसच्या वेळी लोकांवर हल्ले झाले होते. त्यानंतर एका हल्लेखोराने रेस्टॉरंटला लक्ष्य केले, ज्यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला. बॉम्बस्फोटानंतर जोरदार गोळीबारही झाला. हा हल्ला उत्तर किवू प्रांतात झाला. प्रांताच्या गव्हर्नरचे प्रवक्ते एकेंगे सिल्वेन यांनी  सांगितले की जेव्हा सुरक्षा दलांनी हल्लेखोराला गर्दीतून जाण्यापासून रोखले तेव्हा त्याने स्वतःला बॉम्बने उडवले. (हेही वाचा: Congo: काँगोमध्ये 51 जणांना सुनावली फाशीची शिक्षा; UN च्या तज्ज्ञांच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा मोठा निर्णय)

उत्तर किवू हे काँगोचे एक क्षेत्र आहे, जिथे इस्लामिक स्टेट ही दहशतवादी संघटना खूप सक्रिय आहे. याशिवाय देशाच्या इतर भागातही असे अनेक हल्ले होत राहतात. या देशात बंडखोरांचे अनेक गट आहेत, जे नागरिकांवर हल्ले करतात. त्यांना तोंड देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, पण सरकारचे प्रयत्न पुरेसे नाहीत, हे अशा हल्ल्यांवरून स्पष्ट होते.