Galwan Valley Clash: गलवान खोऱ्यातील हिंसक संघर्षात चीनचे मोठे नुकसान, बर्फाळ नदीत वाहून गेले होते 38 सैनिक; ऑस्ट्रेलियन वृत्तपत्राने केला दावा
Galwan valley (Photo Credits-Twitter)

Galwan Valley Clash: एका ऑस्ट्रेलियन तपास वृत्तपत्राने बुधवारी दावा केला की, 2020 मध्ये गलवान खोऱ्यात भारतीय सैनिकांसोबत झालेल्या हिंसक संघर्षात चीनला मोठा फटका बसला होता. रात्रीच्या अंधारात वेगाने वाहणारी नदी ओलांडताना त्यांचे अनेक सैनिक बुडाले होते. यात पाच लष्करी अधिकारी आणि सैनिक मारले गेल्याचे चीनने म्हटलं होतं.

क्लॅक्सन या वृत्तपत्राने आपल्या अहवालात अनेक निनावी संशोधक आणि चिनी ब्लॉगर्सच्या निष्कर्षांचा हवाला दिला आहे. पेपरमध्ये म्हटले आहे की, संशोधक आणि ब्लॉगर यांनी सुरक्षेच्या कारणास्तव नाव देण्यास नकार दिला, परंतु त्यांच्या निष्कर्षांनी संपूर्ण प्रकरणावर नवीन प्रकाश टाकला. (वाचा - Sri Lanka in Financial Crisis: श्रीलंका आर्थिक टंचाईत, भारताने दिले 50 करोड डॉलर्सचे कर्ज)

दरम्यान, 15 जून 2020 रोजी पूर्व लडाखच्या गलवान व्हॅलीमध्ये भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये चकमक झाली. यामध्ये 20 भारतीय जवान शहीद झाले होते. तसेच अनेक चिनी सैनिकही मारले गेले होते. चीनने यापूर्वी कोणतेही नुकसान झाल्याचं नाकारलं होतं. चीनने नंतर सांगितलं होतं की, त्यांचे पाच सैनिक मारले गेले. मात्र, या संघर्षात चीनचे अधिक सैनिक मारले गेल्याचे भारतीय लष्कराने म्हटले होते.

ऑस्ट्रेलियन वृत्तपत्राने मारले गेलेल्या चिनी सैनिकांची संख्या 38 असल्याचं सांगितलं आहे. परंतु, त्यांचे मोठे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. या संघर्षाची चर्चा थांबवण्यासाठी चीनने कठोर कारवाई केल्याचेही वृत्तपत्राने म्हटले आहे.

लडाखसह अनेक भागात सीमावादावरून भारत आणि चीनमध्ये तणाव कायम आहे. आतापर्यंत दोन्ही पक्षांमध्ये चर्चेच्या 14 फेऱ्या झाल्या आहेत. मात्र अद्याप कोणताही निष्कर्ष निघालेला नाही. तथापि, दोन्ही देशांनी आपापसात समस्या सोडवण्याची भाषा केली आहे आणि कोणत्याही तृतीय पक्षाच्या हस्तक्षेपास विरोध केला आहे.