
सध्या संपूर्ण जग ज्या कोरोना विषाणूच्या (Coronavirus) साथीने ग्रस्त आहे, त्याचा उगम चीन (China) मध्ये प्रथम झाला होता. त्यानंतर आता संपूर्ण जग या आजाराचा अनुभव घेत आहे. या आजारामुळे जगभरात लाखो लोक मरण पावले आहेत. यातून बाहेर पडून चीन आता आपले जनजीवन सुरळीत करण्याच्या मार्गावर असताना देशासमोर नवीन संकट उभे ठाकले आहे. आता चीनमध्ये पुराने (Flood) थैमान घातले आहे. दक्षिण आणि मध्य चीनमध्ये पुरामुळे डझनहून अधिक लोक मरण पावले आहेत आणि हजारो लोकांना त्यांच्या घरातून बाहेर पडावे लागले आहे. आपत्कालीन व्यवस्थापन मंत्रालयाने सांगितले की, 2 जूनपासून सुमारे 228,000 लोकांना पुरामुळे आपत्कालीन आश्रय घ्यावा लागला आहे.
या पुरामुळे प्रारंभीचे नुकसान अंदाजे 500 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त असल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये 1000 पेक्षा जास्त घरे नष्ट झाल्याचे नुकसानही समाविष्ट आहे. दक्षिणेकडील गुआंग्झी येथे हा पूर अधिक चिंताजनक होता. त्याठिकाणी सहा जण मृत आणि एक बेपत्ता म्हणून नोंद झाली आहे. तर हुनान प्रांताच्या उत्तरेकडील सात मृत आणि एक बेपत्ता असल्याची नोंद आहे. 2 जूनपासून दक्षिण चीनमधील काही प्रांतात त्यानंतरही जोरदार पाऊस झाला. क्वांगशी, क्वांगटोंग, फुचिन आणि च्यचांग या 8 प्रांतातील 110 नद्यांच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली आहे, ज्यामुळे पूर आला.
यांगशुओ या लोकप्रिय पर्यटनस्थळाचे रस्ते पाण्यामुळे भरले होते, ज्यामुळे रहिवासी आणि पर्यटकांना जागा सोडणे भाग पडले. स्थानिक सरकारने सांगितले की या पुरामुळे एक हजाराहून अधिक हॉटेल्स पाण्याने भरली आहेत आणि 30 हून अधिक पर्यटन स्थळे उध्वस्त झाली आहेत. (हेही वाचा: 1918 मधील Influenza प्रमाणेच कोरोना विषाणू धोकादायक; होऊ शकतात 5-10 कोटी लोकांचे मृत्यू- The Lancet चा दावा)
1998 मध्ये चीनमध्ये वर्षातील सर्वात भीषण पूर आला होता, तेव्हा 2000 हून अधिक लोक मरण पावले होते आणि जवळजवळ 3 दशलक्ष घरे उद्ध्वस्त झाली होती. मात्र, 2019 मध्येही चीनमधील पुरामुळे बर्याच लोकांचा बळी गेला होता. चीनमधील 2019 च्या पूरात जवळपास 201 लोक मरण पावले होते आणि अनेक डझन लोक बेपत्ता झाले होते.