Child Sexual Abuse on Caldey Island: ख्रिश्चनांच्या 'पवित्र बेटा'वर कॅथोलिक भिक्षूंकडून लहान मुलांचे लैंगिक शोषण; 50 हून अधिक जणांनी केले आरोप, चौकशी सुरु
Child Abuse | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Child Sexual Abuse n Caldey Island: यूकेमधून (UK) लहान मुलांच्या लैंगिक शोषणाचे (Child Sexual Abuse) एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. वेल्सच्या किनाऱ्यावरील एका प्रतिष्ठित आणि पवित्र समजल्या जाणाऱ्या कॅल्डे बेटावर (Caldey Island) ख्रिश्चन भिक्षूंनी 50 हून अधिक मुलांचे लैंगिक शोषण केल्याचे उघड झाले आहे. डेलीमेलने याबाबत अहवाल प्रसिद्ध केला आहे. अहवालात एका पीडितेचा उल्लेख आहे ज्याने या ख्रिश्चन मठात कॅथोलिक भिक्षूंनी लहान मुलांचे लैंगिक शोषण केल्याबद्दल माहिती दिली आहे.

कॅल्डे बेट हे 1929 पासून कॅथोलिक ऑर्डरच्या सिस्टर्सियन भिक्षूंच्या मालकीचे आहे. प्रार्थना करणे आणि साधे राहणे यासाठी या ठिकाणाचा वापर होतो. या जागेला 1500 वर्षांचा इतिहास आहे. आता कॅल्डे मठातील ख्रिश्चन भिक्षूंवर लैंगिक शोषणाचे आरोप काही काळापासून समोर येऊ लागले आहेत.

अलीकडेच फादर जॅन रोझी (Jan Rossey) यांची या मठाच्या नवीन प्रमुखपदी निवड झाली. त्यांच्या नियुक्तीनंतर त्यांनी मठातील भिक्षूंवरील सर्व आरोपांची स्वतंत्र चौकशी सुरू केली. हळूहळू लक्षात आले की काही आरोप 1960 आणि 1970 मधील आहेत. फादर रोझी यांनी सांगितले की त्यांनी सर्व आरोप अतिशय गांभीर्याने घेतले आहेत. साउथ वेल्स पोलिसांचे माजी सहायक पोलीस आणि गुन्हे आयुक्त जॅन पिकल्स हे या प्रकरणाच्या चौकशीचे नेतृत्व करणार आहेत.

मठातील लहान मुलांच्या लैंगिक शोषणाविरोधात 'द कॅल्डी आयलंड सर्व्हायव्हर्स कॅम्पेन' ही मोहीम 61 वर्षीय केविन ओ'कॉनेल यांनी सुरू केली आहे. या मोहिमेमुळे या बाल लैंगिक शोषणाच्या सार्वजनिक तपासासाठी लढा देण्यासाठी अनेक लोक पुढे आले आहेत. ओ'कॉनेलने दावा केला आहे की, जेव्हा ते 10 वर्षांचे होते तेव्हा एका इथल्या एका भिक्षूने त्यांच्यावर बलात्कार केला होता आणि त्यांनी मठात इतर मुलांवर होणारे अत्याचार देखील पाहिले होते. केविन यांनी आवाज उठवल्यानंतर आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना आवाहन केल्यानंतर सुमारे, 50 जण पुढे आले आणि त्यांनी दावा केला इथल्या भिक्षूंनी त्यांचा विनयभंग केला होता. आता या सर्वांचे वय 45 ते 60 दरम्यान आहे. (हेही वाचा: Video Call Scam: बंगळुरुत सीमाशुल्क अधिकारी असल्याचे भासवून आरोपींनी महिला वकिलास केले विवस्त्र; गुन्हा दाखल)

कॅल्डे बेटावरील सर्वात कुख्यात भिक्षूंपैकी एक, फादर थॅड्यूस कोटिक याच्यावर 1970 आणि 1980 च्या दशकात मोठ्या संख्येने मुलांशी गैरवर्तन आणि विनयभंग केल्याचा आरोप आहे. यातील अनेक आरोप सिद्धही झाले मात्र या गुन्ह्यांसाठी कोटिकवर खटला चालवला गेला नाही व पुढे 1992 मध्ये त्याचे निधन झाले. 1972 ते 1987 दरम्यान फादर थॅड्यूस कोटिक याने सहा मुलींचा लैंगिक छळ केल्याचे उघड झाल्यानंतर, या पीडितांना भरपाई देण्यात आली होती.